काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दिल्लीत सुरु झाली आहे. मात्र याच दरम्यान उत्तर प्रदेशातील लखनऊमधून राहुल गांधी यांना धक्का देणारी बातमी आहे. राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याबद्दल लखनऊ न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्यावर भारत जोडो यात्रेदरम्यान विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्याचा आरोप आहे. त्यांच्या या विधानाबद्दल न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नृपेंद्र पांडे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अंबरीश कुमार श्रीवास्तव यांनी शुक्रवारी त्यांच्या आदेशात तक्रारदाराला सीआरपीसीच्या कलम २०० अन्वये पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले. नृपेंद्र पांडे शुक्रवारी आपली तक्रार दाखल केली होती. राहुल गांधींच्या विरोधात नोंदवलेल्या या तक्रारीत तक्रारदार आणि त्यांच्या साक्षीदारांच्यावतीने कलम २०० अंतर्गत साक्ष नोंदवल्यानंतर, गुन्ह्यांची दखल घ्यावी की नाही आणि राहुल गांधींना समन्स जारी करायचा की नाही हे न्यायालय ठरवणार आहे. राहुल गांधींशी संबंधित या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ जानेवारी रोजी न्यायालयात होणार आहे.
हे ही वाचा :
माजी सैनिकांचे टेन्शन दूर, आता मिळणार पेन्शन
५४ वर्षांपूर्वी याच दिवशी मानव प्रथमच चंद्राच्या कक्षेत
मोदी सरकारची गरिबांना नववर्षाची भेट
नृपेंद्र पांडे यांनी कलम १५६ (३) अंतर्गत याचिका दाखल करून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली होती. न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी नकार दिला आणि ती तक्रार म्हणून दाखल केली. राहुलने असभ्य शब्द वापरून सावरकरांचा अपमान केल्याचे तक्रारदार नृपेंद्र पांडे यांनी याचिकेत म्हटले आहे. नृपेंद्र यांनी त्यांच्या वकिलामार्फत राहुल गांधी यांच्या विरोधात पुरेसे पुरावे असल्याचा दावाही केला आहे. त्यानंतर न्यायालयाने हे पाऊल उचलले आहे.