25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषऔरंगजेबाची दक्खन कामगिरी (भाग ३)

औरंगजेबाची दक्खन कामगिरी (भाग ३)

आपला शत्रु कळला की मग आपल्या पूर्वजांचं कर्तृत्व अधिक लक्षात येतं. त्यामुळेच मराठ्यांचे तीन छत्रपती ज्या औरंगजेबाशी झुंजले त्याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा हा प्रयत्न! मागील लेखात औरंगजेब दक्खनेत येतो इथपर्यंत पाहिले. आता पुढे

Google News Follow

Related

मीर जुम्ला १८ जानेवारी १६५७ रोजी औरंगबादला पोहोचला. औरंगजेबाने एक शुभ मुहुर्त काढुन ही मोहीम सुरु केली. २८ फेब्रुवारीला तो बिदरला पोहोचला. मीर जुम्ल्याच्या ताकदवान तोफखान्याने बिदरच्या किल्याचे २ बुरुज उध्वस्त केले. २७ दिवसांत हा किल्ला औरंगजेबाला मिळाला. किल्यात बारा लाख रुपये, आठ लाख रुपयांचा दारुगोळा, दोनशे तीस तोफा, अगणित तोफगोळे आणि शेकडो खंडी धान्य मिळाले. शिवाय औरंगजेबाची पंधरा हजारांची फौज विजापुरच्या प्रदेशात घुसुन जाळपोळ करत होतीच. त्याने अनेक आदिलशाही सरदार गळाला लावायचे प्रयत्न सुरु केले. २३ एप्रिल १६५७ या दिवशी औरंगजेबाच्या छावणीत सोनाजी पंडित नावाचा एक वकील आला. कुणा “शिवाजी शहाजी भोसले” नावाच्या एका मामुली  बंडखोराने जिंकलेल्या आदिलशाहीच्या मुलखाला मुघलांची मान्यता मिळावी अर्जदास्त केली होती. औरंगजेबाने सोनोपंत डबीरांबरोबर शिवाजी महाराजांसाठी एक पत्र दिले – “सांप्रत जे किले व मुलुख विजापूरकडील तुमचे हाती होते ते पेशजीप्रमाणे होऊन तुमचे मनोगतान्वये बंदर दाभोळ व त्याज खालील मुलुख तुम्हांस दिला असे. ऐशियास इकडील दौलतीची किफायत मदत जी करणे असेल तिचा समय हाच आहे. जाणोन करण्यात आणावे आणि हुजुरभेटीला यावे. इकडील लक्ष दिवसेंदिवस तुमच्या उत्कर्षाकडे आहे. कामकाजाची तरतूद आपले उर्जिताचे कारण मानून करीत जावी. आमचा लोभ पूर्ण आहे असे मानीत जाणे.” हे पत्र मिळाल्यावर मोजून सातव्या दिवशी मराठ्यांनी जुन्नरचे मोगली ठाणी लुटले. रात्री जुन्नरच्या व्यापारी पेठेवरती हल्ला केला. शिड्या लावून तट ओलांडून ते शहरात शिरले. बादशाही सैन्याची तीनशे बादशाही घोडे, खजिन्याची रक्कम वगैरे मौल्यवान वस्तू घेऊन ते पसार झाले. मुघलांना मराठ्यांचा असा पहिला राजकिय आदाब अर्ज झाला होता. मे महीन्यात मराठे अहमदनगरपर्यंत घुसले आणि लुट करुन परतले. औरंगजेब कमालीचा संतापला. त्याचे सैन्य कल्याणीच्या वेढ्यात गुंतले होते त्याचाच फायदा शिवाजीराजांनी घेतला. आदिलशहाने कल्याणीच्या रक्षणार्थ तीस हजार फौज पाठवली. दोन महिने मुघल – आदिलशहा लढत राहीले. २२ जुलै रोजी महंमद सुलतानने व मीर जुम्ल्याने संयुक्त हल्ला करुन आदिलशाही सैन्याला हरवले. २९ जुलै रोजी कल्याणी किल्यात मुघलांना प्रवेश मिळाला पण पुढले ३ दिवस किल्लेदार दिलावरखानाने बालेकिल्यातून निकराचा लढा दिला. अखेर नाईलाजाने त्याने किल्ला सोडला. कल्याणी सारखा भक्कम आधार गेल्यावर आदिलशहाने तह करण्याची तयारी दाखवली. आदिलशहाने आपला वकील दिल्लीला पाठवला. पुन्हा एकदा औरंगजेबाच्या परोक्ष सगळ्या वाटाघाटी झाल्या. एक कोट रुपये, बीदर, कल्याणी आणि परींड्याचा बलदंड किल्ला व त्याच्या आसपासचा मुलुख मुघलांना मिळावा असा तह झाला. औरंगजेबाला पाठवलेली खास कुमक पुन्हा माळवा प्रांतात बोलावली. यशाचा शीरपेच औरंगजेबाच्या किमॉंशात लागलाच नाही. पण नियती काय खेळ खेळेल सांगता येत नाही. ६ सप्टेंबर १६५७ रोजी शहाजहान गंभीररित्या आजारी पडला. इतिहास कूस बदलत होता आणि नवा संघर्ष औरंगजेबाच्या समोर ऊभा राहीला होता.

आधीचे भाग वाचण्यासाठी क्लिक करा

१. आलमगीर औरंगजेब: मराठे ज्याला पुरून उरले (भाग १)

२. दख्खनेत कसा आला हिंदूद्वेष्टा औरंगजेब (भाग २)

शहाजहान आजारी पडल्याने जनतेला दिवसातून एकदा तरी “दर्शन” देण्याचा रिवाज थांबला. वरुन दाराने आपले विश्वासू लोक शहाजहान भोवती पेरुन इतर कुणालाही शहाजहानला भेटायची बंदी घातली. जनतेत कुजबुज सुरु झाली. त्यामुळे बघता बघता शहाजहान आजारी आहे इथपासून शहाजहान मेला इथवर बातम्या पसरु लागल्या. दारा जी बाब गुप्त राखू इच्छित होता ती जास्त लपवणे आता शक्य नव्हते. उरलेल्य तीनही मुलांकडे ही बातमी हस्ते – परहस्ते पोहोचलीच. पण त्यांना शहाजहानच्या शिक्याची पत्रे मिळत होती. ही पत्रे खरच शहाजहान पाठवत आहे की दाराने सगळा कारभार आपल्या हातात घेतला आहे आणि तोच ह्या चाली खेळत आहे हे उरलेल्या तीन शहजाद्यांना समजत नव्हते. औरंगजेबाने आपली पाऊले टाकायला सुरुवात केली. मीर जुम्ल्याला परींडा किल्यावरती हल्ला करायला पाठवले. नगरमधील अधिकार्‍यांना बंडखोर  “सिवा भोसला” विरुद्ध कारवाई करायचे आदेश दिले. कल्याणीकडून तो बिदर मध्ये आला तिथे किल्याची मजबुती करुन तो औरंगाबादला आला. २८ ऑक्टोबर रोजी त्याने नर्मदेवरील टपाल चौक्या ताब्यात घेतल्या. मुराद आणि शुजाशी त्यानी संपर्क केला. पण शुजाने अत्यंत घाईघाईने राज्याभिषेक करवून घेतला. त्याने “शहा शुजा गाजी, तैमुर तिसरा, सिकंदर दुसरा आणि अबुल फैज नसिरुद्दिन महंमद” हे सगळे किताब घेतले. तो सैन्याची जमवाजमव करु लागला. दारा अस्वस्थ होता. त्यालाही ह्या बातम्या कमी-जास्त अंतराने मिळतच होत्या. त्याने मीर जुम्ल्याला वजीर पदावरुन दूर केले. दरम्यान शहाजहानची तब्येत किंचित सुधारली. दाराने त्याचे कान फुंकुन शुजावरती आपला थोरला मुलगा सुलेमान शुकोह, दिलेरखान आणि मिर्झाराजा जयसिंग यांच्या हाताखाली बावीस हजारांची फौज देऊन ३० नोव्हेंबर रोजी त्यांना धाडले. जाताना शाहजहानाने शक्यतो युद्ध होणार नाही असे बघ असा सल्ला वजा आदेश दिल्याने जयसिंगाने शुजाला समाजावणीचे पत्र लिहिले. शुजाने तुमची विनंती मी मान्य करतो पण आधी तुम्ही सैन्य मागे न्यावेत तरच मला विश्वास ठेवता येईल असा उलट जबाब पाठविला. संघर्ष टाळण्यासाठी जयसिंग मागे फिरला मात्र शुजाने बनारसजवळ पाठून हल्ला केला. राजपूत सेनेने त्यांना इतके तिखट उत्तर दिले कि शुजाला पार बंगालपर्यंत माघार घ्यावी लागली. वास्तविक बनारसच्या युद्धानंतर तिथेच थांबावे व आग्र्याला परत फिरावे असा शहाणपणाचा सल्ला जयसिंगाने सुलेमान शुकोहला सल्ला दिला होता. पण शुजाचा नायनाट करावा म्हणून सुलेमान शुकोह त्याला बंगालच्या दिशेने पिटाळत राहिला.

हे सुरु असताना दुसरीकडे गुजरातमध्ये ५ डिसेंबर रोजी मुरादने “मउव्वाजुद्दिन” ही पदवी धारण करुन स्वत:ला राज्याभिषेक करुन घेतला. औरंगजेब मात्र शांत होता. त्याने मुराद बरोबर हातमिळवणी केली. एक गुप्त करार झाला. मुरादने पंजाब, अफगणिस्थान, काश्मीर आणि सिंध प्रांत घ्यावा आणि उरलेला प्रदेश औरंगजेबाने घ्यावा. मुरादने पैसा ऊभा करण्यासाठी आपल्या शहाबाझखान नावाच्या विश्वासू खोज्याच्या हाताखाली सहा हजारांची फौज देऊन सुरतेवरच हल्ला करायला पाठवले. त्याने २० डिसेंबर रोजी सुरत किल्यावरील तोफा, दारुगोळा आणि पाच लाख रुपये लुटले. परिंड्याचा किल्ला मीर जुम्ल्याला दाद देईना. तो वैतागुन औरंगजेबाकडे निघून आला. मीर जुम्ल्याचे कुटुंब दिल्लीत असल्याने त्याला उघड औरंगजेबाची बाजू घेता येईना तेव्हा औरंगजेबाने मीर जुम्ल्याला आदिलशहाशी हातमिळवणी केल्याच्या नावाखाली अटक करायचा देखावा केला. आता मीर जुम्ल्याकडचा सरकारी तोफखाना सहजतेने औरंगजेबाकडे आला. दाराने सूत्रे आपल्या हातात घेऊन मुरादची बदली गुजरात वरुन वर्‍हाडात केली जेणेकरुन मुराद आणि औरंगजेबात भांडण होईल. पण मुरादने त्याची दखलही घेतली नाही. दाराने जसवंतसिंहाला औरंगजेबावरती धाडले. बरोबर कासिमखान होता. मुघल साम्राज्यात ऊभी फुट पडली होती.

औरंगजेबाने आपले बळ वाढविणे सुरुच ठेवले. मुरादशी त्याने हातमिळवणी केली. कुराणावर हात ठेवून पंजाब, अफगाणिस्थान, काश्मीर आणि सिंध मुरादकडे व उरलेले हिंदुस्थानचे सुभे आपल्याकडे येईल असा प्रस्ताव पाठवीत आहोत असे पत्र पाठविले. उतावीळ मुरादने त्याला मान्यता दिली. आता औरंगजेबाने कुत्बशहा, आदिलशहांना पत्रं पाठवली. शांततेचे करार केले. आदिलशहाला खंडणीतून तीस लाख माफ केल्याचे कळवले. तसेच दहा हजार फौजेच्या मदतीची मागणी केली. याच दरम्यान शिवरायांचे वकील रघुनाथपंत औरंगजेबाला भेटायला आले. औरंगजेबाने नाईलाजाने जुळवून घेतले. “तुमच्या पेशजीच्या गोष्टी विसरण्या जोग्या नहीत तथापि तुम्ही आपले कृत्यांचा पश्चात्ताप केला आणि हा दरबार उपेक्षेचा नाही हे जाणोन, वडिलांचे लक्ष निभ्रांत इकडे आहे हे समजोन तुमचे पूर्वकृत्य मनात आणित नाही. याविषयीचा संतोष मानून इकडिल दौलतीविषयी कोशिश करीत जावी. आपले वतनी महाल, किल्ले, व कोकण देश सुद्धा नगरवालेखेरीज विजापूरकर आदिलखानचे इलाख्यात जे आहेत ते त्यांजकडून मुलूख हस्तगत झाल्यानंतर बंदोबस्त होण्याविषयी वचन असावे….” म्हणजे औरंगजेब आदिलशहाला त्या बंडखोरावरती हल्ला कर म्हणून सांगतो तर दुसरीकडे शिवरायांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी जिंकलेल्या आदिलशाही मुलुखाला मान्यता देतो. शिवरायांनी आपले पाचशे स्वार मदतीला पाठविण्याची तयारी दर्शवली होती. पण तसे काही झाले नाही. ५ फेब्रुवारी १६५८ ला औरंगजेबाने मुर्शिद कुलीखान, शेख मीर, अकिलखान राजी, काबीलखान, महंमद ताहीर, मुलगा महंमद सुलतान, रावकर्ण, शुभकर्ण बुंदेला आणि इंद्रमण यांना घेतले. १८ फेब्रुवारीला तो बुर्‍हाणपूरला पोहोचला. त्याला मुराद येउन मिळाला. एक महिना दोघांनी योजना बनवून २० मार्च रोजी त्यांनी बुर्‍हाणपूर सोडले.

(क्रमशः)

संदर्भ –

१) हिस्टरी ऑफ औरंगजेब- सर जदुनाथ सरकार

२) द एम्परर हू नेव्हर वॉज- सुप्रिया गांधी

३) सिंध इन मुघल एम्पायर- अमित पालीवाल

४) मुसलमानी  रियासत भाग २ – रियासतकार सरदेसाई

५) स्टोरिया डो मोगोर- निकोलाओ मनुची

६) औरंगजेब: शक्यता आणि शोकांतिका- रवींद्र गोडबोले

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा