भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर हे महाविकास आघाडी सरकारवर चांगलेच बरसले. अहमदनगरचे रेखा जरे हत्याकांड, सदनिकांची मालमत्ता कर माफी, बीडीडी चाळ, एसआरए मधील पुनर्वसनाचा सावळा गोंधळ अशा अनेक मुद्द्यांवरून त्यांनी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.
अहमदनगर मधील रेखा जरे हत्याकांडातील आरोपी पत्रकार बाळ बोठे ह्याचा तपास तीन महिने झाले तरी होत नाहीये. पोलिसांनी आता मंत्र्यांच्या घरावर धाडी टाकाव्यात म्हणजे तरी बोठे सापडतात का बघू असा टोला आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला.
मुंबईकरांना ५०० स्क्वेअर फूटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्यात येईल असे सांगण्यात आले. हे वचन देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पण मुंबईकरांचा मालमत्ता कर काही माफ झाला नाही. या महाभकास आघाडी सरकारला कोणताही विकास प्रकल्प पूर्णत्वास नेत्यात रस नाही फक्त टेंडर आमच्या काळात निघाली पाहिजेत यातच रस आहे असे म्हणत आमदार भातखळकरांनी सरकारला धारेवर धरले. बीडीडी चाळीचा प्रकल्प युती सरकारच्या काळात मंजूर झाला होता. त्यानंतर आलेल्या आघाडी सरकारने काही केले नाही. फडणवीस सरकारने हा प्रकल्प मार्गी लावला. पण महाविकास आघाडी सरकारने नवीन प्लॅन केला, खर्च वाढवून पुन्हा नव्याने टेंडर काढण्यात आले.
कोरोनाच्या काळातही मुंबईकरांना मदत नाही
सत्तर हजार कोटींच्या फिक्स्ड डिपॉझिट असणाऱ्या मुंबई महापालिकेला सरकारने एक रुपयाचीही मदत केली नाही. घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षाचालक, टॅक्सीचालक, इतर सर्वसामान्य नागरिक कोणालाच मदत करण्यात आली नाही. कोविड काळात मुंबईमध्ये चार चार वेळा पाणी साचलं पण सरकारने मदत केली. मुंबई उपनगराचे पालकमंत्री भिंग लावून शोधले तरी दिसले नाहीत. कोविड काळात मुंबईची फक्त एक ऑनलाईन बैठक सरकारने घेतली.
“सरकारकडे संजय गांधी निराधार योजना, रमाबाई आंबेडकर निराधार योजना, इतर लोककल्याणाच्या योजना यांना द्यायला सरकारकडे पैसे नाहीत. पण कोरोना काळात मंत्र्यांसाठी नव्या गाड्या घेतल्या गेल्या, वकिलांना कोट्यवधी रुपये दिले, अनेक भ्रष्ट सरकारी बिले दिली गेली.” असे सांगत आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारने फेडलेल्या भ्रष्ट बिलांचा कच्चाचिठ्ठा मांडत सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे वस्त्रहरण केले.