राज्याच्या सत्तांतरात गुवाहाटीचे स्थान वेगळेच आहे. सत्तांतरानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांसह गुवाहाटीत कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी गेलेत. या दौऱ्यासाठी शिंदे गटातील दिग्गज नेते गुवाहाटीला रवाना झालेत. मात्र, हा दौरा अचानक ठरल्याने काही आमदारांनी दांडी मारल्याचे समोर आले. शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे गुवाहाटी दौऱ्यावर गेलेले नाहीत. हे चार नेते गुवाहाटीला गेले नाहीत यावर मीडियाने तसेच अनेकांनी खयाली पुलाव शिजवायला सुरुवात केली. हे नेते नाराज असल्याने कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले नाहीत अशा बातम्या समोर येऊ लागल्या. मीडियाने अब्दुल सत्तारांना विचारणा करायला सुरुवात केली नाराज आहात का? देवीच्या दर्शनाला न जाण्याचं कारण नाराजी आहे का? अशा प्रश्नांनी मीडियाने सत्तारांना भांबावून सोडले. शिंदे गटातील एखादा आमदार वेगळे काही करताना दिसला की मीडियाला त्यात नाराजी दिसू लागते. त्यामुळे जरा काही झालं की लगेच मीडिया नेत्यांसमोर उभा रहातो शिंदे गटावर नाराज झालात का विचारायला.
गेल्या पाच महिन्यांपासून शिंदे गटातील नेत्याने कोणत्या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही किंवा त्याने काहीतरी वेगळे विधान केले किंवा आणखी काय कारण असले की लोकांमध्ये किंवा मीडियामध्ये चर्चा रंगायला सुरुवात होते. शिंदे गटातील आमदार नाराज. शिंदे गटात सारे काही आलबेल नाही. शिंदे गट फुटणार. त्यातच मग विरोधी उद्धव ठाकरे गटातील नेते हे शिंदे गटातून कसे आमदार आपल्या संपर्कात आहेत, ते कसे फुटणार आहेत, हे बोलायला सुरुवात करतात. काही दिवसांपूर्वीच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला तेव्हासुद्धा ज्या आमदारांना मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे ते आमदार कसे नाराज झाले हेच दाखवण्यात येतं होतं. तीन महिन्यांपूर्वी ठाकरे गटात सामील झालेल्या सुषमा अंधारे यांना तर आतल्या सूत्रांपेक्षा जास्त माहिती असते. त्यांच्या दर दोन दिवसांच्या भाषणात त्या सांगतात की, हा आमदार नाराज तो आमच्या संपर्कात आहे. शेवटी त्या आमदाराला मीडियाला सांगावं लागत मी नाराज नाही. म्हणजे शिंदे गटात कोण नाराज आहे का याची शोधमोहीमचं मीडियाने सुरु केलीय. शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी असल्याचा दावा सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यासह अनेक महाविकास आघाडीतील नेते करत असतात.
काही दिवसांपूर्वीच सुषमा अंधारेंनी आमदार संजय शिरसाट शिंदे गटातून बाहेर पडून स्वगृही परतणार असल्याचा दावाही केली होता. मग मीडियामध्ये याच्या ठळक बातम्या येऊ लागल्या, संजय शिरसाट नाराज, परत येणार ठाकरे गटात. या बातम्यांना कंटाळून अखेर संजय शिरसाट यांनीच मीडियाला याबाबत प्रतिक्रिया दिली. सुषमा ताईंना माझ्याबद्दल चांगलं वक्तव्य केलं. बरं वाटलं कोणीतरी काळजी करणार आहे पण स्पष्टपणे सांगायचं झालं तर मी नाराज नाही. आणि नाराज असण्याचं कारणच नाहीय, असं संजय शिरसाट म्हणाले होते. शिरसाट यांनी अशा बातम्या पुन्हा दिल्या गेल्या तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला होता.
आमदारांनी वारंवार स्पष्ट करूनही सुषमा ताईना आमदार नाराज असल्याच्या बातम्या कुठून येतात हेच कळत नाही. शिंदेसाहेबांसोबत आम्ही गेलो असलो तरी आम्ही सर्वांनी मिळून मंत्रिमंडळाचे निर्णय घेतलेत त्यामुळे नाराज व्हायचं कारण नाही असं उत्तर संजय यांनी दिलं होत. सुषमा अंधारे किंवा महाविकास आघाडी याच शोधात आहेत की शिंदे गटात कोण नाराज आहे पण त्यांच्या मनाप्रमाणे कोणी नाराज होईनात मग मीडिया आणि हे आमदार नाराज असल्याचे पोकळ दावे करत असतात. शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची माहिती गोळा करण्यासाठी मीडियाचा जो काही आटापिटा चाललेला असतो तो बघून आमदारच पुढे येऊन सांगत मी नाराज नाही. तानाजी सावंत यांनी काही दिवसांपूर्वीच मीडियाला याप्रकरणी फटकारलं होत. त्यांनी मीडियाला स्पष्ट सांगितलं होत की, नाराज असल्याचं खोट्या बातम्या, व्हीडिओ दाखवू नका.
महाविकास आघडीचे सरकार असताना त्यातील आमदारांमध्ये कसा एकोपा आहे, ते कसे एकत्र आहेत, याचे कौतुक केले जात असे. एखाद्या निवडणुकीतही मविआ एकत्रपणे कशी लढत आहे, याचे दाखले दिले जात असत. असच चित्र नेहमी उभं केलं कि महाविकास आघाडी भक्कम आहे. त्यावेळी देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनी अनेकदा सांगायचं प्रयत्न केला होता, महाविकास आघाडीत कसा अंतर्गत विरोध आहे. मात्र, मविआने नेहमी आपण भक्कम असल्याचंच चित्र उभं केलं. मीडियानेही तेच चित्र वारंवार आपल्या माध्यमातून दाखवलं. पण अडीच वर्षानंतर तेही चित्र स्पष्ट झालं आणि तो फेविकॉलचा जोड किती कमजोर असल्याचं दिसून आलं. एकनाथ शिंदे आणि आमदारांनी बंड केल्यावर मात्र महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद हळू हळू चव्हाट्यावर येऊ लागले. मग काँग्रेसच्या नाना पटोलेंनीसुद्धा मविआ काही नैसर्गिक मैत्री नसल्याचं सांगितलं होत. त्यांच्यात अंतर्गत वाद होते म्हणूनच तर एवढे मोठे राज्यात सत्तांतर झाले. मात्र आता सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटात नाराजी आहे का हे शोधण्याचा उगाच प्रयत्न सुरु आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी बच्चू कडू नाराज असल्याच्या बातम्या आल्या. पुढे रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद इतका दाखवण्यात आला. त्यांच्यात कसा दुरावा निर्माण झाला त्यांचं भांडण कस विकोपाला गेलं हेच दाखवण्यात आलं. शिंदे गटातील आमदार काही कारणास्तव कुठे गेले नाहीत कि त्यांना लगेच विचारणा सुरु होते. म्हणजे आमदारांनो शिंदे गटात तुम्ही नाराज आहात, हे कृपया काहीहीकरून सांगा एकदाचे याचाच आटापिटा सुरु आहे.