आयकर विभागाने धडक कारवाई करत हिंदी चित्रपट सृष्टीतील काही बड्या कलावंतांच्या घरी छापे मारले आहेत. यात प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू , विकास बेहल या नावांचा समावेश आहे. करचोरीच्या संशयावरून आयकर विभागातर्फे हा तपास सुरु आहे.
बुधवारी आयकर विभागातर्फे मुंबई, पुणे येथील एकूण बावीस ठिकाणांवर छापे मारल्याची माहिती मिळत आहे. ‘फँटम फिल्म्स’ या चित्रपट निर्मितीच्या कंपनीशी संलग्न असलेल्या कलाकारांच्या घरी आणि कार्यालयांवर छापे मारत आयकर विभागातर्फे तपास सुरु आहे. या छापेमारीत आयकर विभागाच्या हाती काही लागले आहे का याची अजून माहिती मिळाली नाहीये.
हे ही वाचा:
“या सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे”- सुधीर मुनगंटीवार
आयकर विभागाला अशी माहिती मिळाली होती की चित्रपट जगतातील या काही दिग्गजांकडून करचोरी केली जात आहे. या चित्रपटांतून जे उत्पन्न मिळते त्यावर जो कर भरणे अपेक्षित होते तो भरला गेला नाहीये असा संशय असल्यानेच आयकर विभागाकडून कारवाई करत तपास केला जात आहे.
‘फँटम फिल्म्स’ ही चित्रपट निर्मितीची कंपनी २०१० साली अनुराग कश्यप, विकास बेहल, विक्रमादित्य मोटवानी आणि मधू मंटेना या चौघांनी सुरु केली. पण कालांतराने अंतर्गत वादांमुळे ही कंपनी बंद पडली आहे.