महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित हौशी मराठी नाट्य स्पर्धा अहमदनगर येथे सुरु झाली आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सादर करण्यात आलेल्या ‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ या नाटकामुळे मोठा राडा झाला. या नाटकामध्ये चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची चुकीची प्रतिमा मांडली जात असल्याचा आक्षेप सावरकरप्रेमी व हिंदुत्ववादी संघटनांकडून घेण्यात आला. सावरकरप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी या नाटकाला तीव्र आक्षेप घेतला. सावरकर प्रेमींनी रंगमंचावर उभे राहून, ‘हे नाटक बंद करा’अशी घोषणाबाजी केली. शेवटी पोलिसांना मध्ये पडावे लागले.
अहमदनगरच्या माउली संकुल सभागृहात ६१ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा १५ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. या स्पर्धेत उल्हास नलावडे लिखित व दिग्दर्शित ‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ हे नाटक नगरच्या स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने सादर करण्यात आले. या नाटकाच्या संहितेमध्ये महात्मा गांधी हत्या, नथुराम गोडसे यांना पश्चात्ताप व या घटनेशी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा संबंध जोडून ते यासाठी दोषी असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न झाल्याचा आक्षेप सावरकरप्रेमींनी यावेळी केला.
हे ही वाचा :
क्रोएशियातही आता मल्लखांब रोवला!
विनयभंगप्रकरणी आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर
प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असले पाहिजे
हेमंत सोरेन चौकशीला या! ईडीने पाठवले दुसरे समन्स
नाटकामध्ये चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचे कळताच काही हिंदुत्ववादी संघटनांनी सभागृहाकडे धाव घेतली. नाटकातून चुकीचा इतिहास रसिकांसमोर मांडला जात आहे. त्यामुळे सावरकर प्रेमी व हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचा आरोप सावकर प्रेमी उत्कर्ष गीते यांनी केला. या नाटकाच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाटकाची स्क्रिप्ट सेन्सॉर होऊन आली असेल, तर अशा स्क्रिप्टला परवानगी दिली कशी, तेथील इतिहासकारांनी त्याची तपासणी करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली .