राज्याच्या राजकारणात ५० खोक्यावरून झालेला वाद आता न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षावर ५० खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा प्रवक्ते विजय शिवतारे यांनी दिला आहे.
शिवसेनेतील बंडानंतर ५० खोके, एकदम ओके अशी घोषणाबाजी विधिमंडळच्या पायऱ्यांवरून सुरुवात झाली. पुढे त्यावरून शिंदे गटाच्या आमदारांवर सातत्याने टीका केली जातं आहे. महाविकास आघाडीतील नेते शिंदे गटावर खोक्यांची सातत्याने टीका करत आहेत. आदित्य ठाकरे त्यांच्या प्रत्येक सभेत शिंदे गटाला खोके सरकार म्हणून संबोधतात. नुकतंच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या शिर्डीच्या अधिवेशनात खोक्यांवर टीका केली. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण पुन्हा तापलं. त्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी शिंदे गटानं आता कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
विजय शिवतारे म्हणाले, काल सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की, जर माझ्यावर कोणी असे आरोप केले असते तर मी त्याला नोटीस दिली असती. मी त्याच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला असता, मानहानीचा खटला केला असता. सुप्रिया सुळेंचा हा सल्ला आम्ही ऐकलेला आहे. माझी बऱ्याच आमदारांशी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. जर इतक्या ताकदीने महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी जे हिंदुत्वाचं नैसर्गिक सरकार बनलेलं आहे, त्याला जर अशाप्रकारे दोष दिले जात असतील आणि त्याची बदनामी केली जात असेल तर निश्चितपणे ५० आमदारांच्यावतीने प्रत्येकी ५० कोटी असे २ हजार ५०० कोटींचे अब्रुनुकसानीचे दावे, मानहानीचे खटले, उद्या त्याची प्रक्रिया सुरू होत आहे, नोटीसा दिल्या जातील.
हे ही वाचा:
दिल्ली, उत्तर भारतासह नेपाळमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के
भारत जोडो यात्रेत शरद पवारांऐवजी ; दुसरे नेते होणार सामील
कुनोच्या राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांनी केली ‘पहिली’ शिकार
टीम इंडियाने गोलंदाजांसाठी सोडल्या बिझनेस क्लास सीट्स
तसेच, खोके आणि बोके अजित पवारही म्हणत आहेत. आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळेही खोके सरकार बोलत असतात, त्यामुळे या तिघांनाही नोटीस पाठवली जाणार असल्याचे विजय शिवतारे यांनी सांगितले आहे.