सूर्यकुमार यादवच्या झंझावाती खेळीमुळे भारताने टी-२० वर्ल्डकपमधील गटातील अखेरच्या सामन्यात झिम्बाब्वेवर ७१ धावांनी दणदणीत मात करत गटात अव्वल स्थान मिळविले. सूर्यकुमारने अखेरच्या दोन षटकात केलेल्या फटकेबाजीने चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणेच फिटले. त्याने २५ चेंडूंत ६१ धआवांची खणखणीत खेळी केली. सूर्यकुमारच्या या खेळीत ६ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.
याआधीच खरेतर भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित झाला होता, पण या सामन्यातील विजयामुळे भारताला अव्वल स्थान मिळविता आले. आता पहिल्या गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या इंग्लंड संघाशी भारताची उपांत्य फेरीत गाठ पडेल. दुसरी उपांत्य लढत पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान येणार का याची आता प्रतीक्षा आहे.
भारताने याआधी पाकिस्तानला गटातील सामन्यात पराभूत केले होते. त्यामुळे आता अंतिम सामन्यात भारत पाकिस्तान लढत झाली तर जगभरातील क्रिकेटचाहत्यांच्या नजरा त्या सामन्याकडे असतील.
हे ही वाचा:
आलिया -रणबीरच्या घरी, आली लहानगी परी
आणि पियुष गोयल पत्रकारावर संतापले
झिम्बाब्वेच्या सामन्याआधीच भारत उपांत्य फेरीत, पाकिस्तानचाही प्रवेश, दक्षिण आफ्रिका बाद
एका लग्नाची पुढची गोष्टचा १२,५०० वा प्रयोग, राज-फडणवीस उपस्थित राहणार
भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १८६ धावा केल्या. अखेरच्या दोन षटकात भारताने ३४ धावांची लूट करत धावसंख्या १८६पर्यंत नेली. त्यात १९व्या षटकात १३ आणि शेवटच्या षटकात २१ धावा काढल्या. त्यात सूर्यकुमारने दोन षटकार एक चौकार लगावला. भारताचा सलामीवीर के.एल. राहुलने ५१ धावांची खेळी केली.
भारताच्या या धावसंख्येचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला १७.२ षटकांत ११५ धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. त्यात रवीचंद्रन अश्विनने २२ धावांत ३ बळी घेतले.