गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आम आदमी पक्षकडून मुख्यमंत्रीपदासाठी पत्रकार इसुदन गढवी यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वीच आप पक्षाला गुजरातमध्ये मोठा धक्का बसला आहे. आपचे नेते इंद्रनील राजगुरू यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
इंद्रनील राजगुरू त्यांच्यावर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार होण्यासाठी दबाव आणत होते. पक्षाच्या सर्वेक्षणात इसुदन गढवी यांना सर्वाधिक पाठिंबा मिळाला असून इंद्रनील राजगुरू यांच्या बाजूने फारच कमी मते पडली आहेत. इंद्रनील राजगुरू यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बनवण्यास आप पक्षाने नकार दिला होता. नाराजीमुळे इंद्रनील राजगुरू यांनी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराच्या घोषणेतही सहभाग घेतला नव्हता, अशी माहिती आहे.
हे ही वाचा:
मोरबी दुर्घटनेत मदतीसाठी गेले आणि मिळाले स्वतःच्याच मुलांचे मृतदेह
नवाब मलिक यांची एवढी संपत्ती होणार जप्त
मुंबई पोलिसांच्या ‘ऑपरेशन रीयुनाईट’ची यशस्वी कामगिरी
भारताने कुवेतला कुवत दाखवत जिंकले सुवर्ण
इंद्रनील राजगुरू हे पूर्वी काँग्रेस पक्षातच होते, मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. काँग्रेसमध्ये प्रवेश करताना इंद्रनील राजगुरू म्हणाले की, आम्ही नेहमीच काँग्रेससोबत आहोत. मी आपामध्ये गेलो हे माझ्या कुटुंबालाही मान्य नव्हते. मात्र, भाजपाचा पराभव करण्यासाठी मी ‘आप’मध्ये सामील झालो होतो, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, गुजरातमध्ये १ डिसेंबर आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तसेच १८२ विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ८ तारखेला जाहीर होणार आहे.