भारताने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेशवर ५ धावांनी मात करत उपांत्य फेरीतील प्रवेशाचा आपला दावा पक्का केला आहे.
ऍडलेडवरील या विजयामुळे पाकिस्तानची मात्र भारताने कोंडी केली आहे. उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या पाकिस्तानच्या सर्व आशा संपुष्टात मात्र आलेल्या नाहीत. दोन सामने त्यांना खेळायचे आहेत. आता त्यांना दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धच्या लढती जिंकाव्याच लागतील. सोबत दक्षिण आफ्रिकेचा संघ नेदरलँड्सकडून पराभूत झाला तर. जर नेदरलँडस आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला तरीही पाकिस्तानला संधी आहे. जर भारताला झिम्बाब्वेकडून मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला आणि पाकिस्तानने आपल्या दोन्ही लढती जिंकल्या तरीही त्यांना संधी आहे. पण ही शक्यता फार धूसर वाटते. सर्वप्रथम त्यांना गुरुवारी दक्षिण आफ्रिकेला नमवावे लागेल. पण तिथे ते पराभूत झाले तर मात्र त्यांचे आव्हान संपुष्टात येणार आहे.
हे ही वाचा:
अमृता फडणवीस यांना म्हणून नको आहे ट्रॅफिक क्लिअरन्स वाहन
मिनीटॉय ट्रेनची शिट्टी ३ वर्षानी वाजली पण अनर्थ टळला
घरी बसून महाराष्ट्र पिंजून काढतायत उद्धव ठाकरे….
ब्रिजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार, मनसे विरोध करणार?
दरम्यान, दुसऱ्या गटातील या लढतीकडे सर्वांचे लक्ष होते. भारताने ६ बाद १८४ अशी धावसंख्या उभारूनही मध्येच कोसळू लागलेल्या पावसामुळे भारतीय संघ दडपणाखाली आला होता. डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला फटका बसू शकेल असेही म्हटले जाऊ लागले होते. पण पाऊस थांबला आणि भारतीय संघाचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. बांगलादेशने ६ बाद १४५ धावसंख्येपर्यंत मजल मारली.
के.एल. राहुलची ५० धावांची खेळी आणि फॉर्मात असलेल्या विराट कोहलीच्या नाबाद ६४ धावा तसेच सूर्यकुमार यादवची ३० धावांची खेळी याच्या जोरावर भारताने २० षटकांत ६ बाद १८४ धावा केल्या. बांगलादेशच्या हसन मेहमूदने ४७ धावांत ३ बळी घेतले. त्यानंतर बांगलादेशने भारताच्या या आव्हानाचा पाठलाग करताना जबरदस्त सुरुवात केली. नईमुल शांटो (२१) आणि लिट्टन दास (६०) यांनी पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली तेव्हा भारतीय संघावरील दबाव वाढू लागला. त्यातच पाऊस कोसळू लागला आणि डकवर्थ नियमानुसार बांगलादेशचा संघ १७ धावांनी पुढे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जर पाऊस पडतच राहिला तर मात्र भारतीय संघाला कदाचित पराभव पत्करावा लागेल की काय अशी भीती निर्माण झाली.पण पाऊस थांबला आणि बांगलादेश संघाची घसरगुंडी उडाली. १ बाद ६८ वरून त्यांचा डाव ६ बाद १०८ असा कोसळला. डकवर्थ लुईस नियमानुसार १६ षटकांत १५१ धावांचे नवे लक्ष्य त्यांना देण्यात आले होते. ते पार करताना बांगलादेश संघाची दमछाक झाली.