कल्याण- ठाकुर्ली चोळेगावातील स्वयंघोषित बांधकाम व्यवसायिकाला पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकारी यांच्या खुर्चीत बसून व्हिडीओ शूट करणे चांगलेच महागात पडले आहे. शूट केलेला व्हिडीओ आणि हातात पिस्तुल घेऊन काढलेला व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुरेंद्र पाटील याच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
सुरेंद्र पाटील हा कल्याण येथील ठाकुर्ली चोळेगाव या ठिकाणी राहण्यास आहे. चोळगावातील जमीनदार असलेल्या सुरेंद्र पाटील याच्याकडे अफाट संपत्ती बघून काही जणांनी त्याची फसवणूक करून त्याच्याकडून लाखो रुपये लाटले होते. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात सुरेंद्र पाटील याने तक्रार केल्यानंतर एका मांत्रिकासह तिघांना अटक केली होती, त्यानंतर सुरेंद्र पाटीलची मानपाडा पोलीस ठाण्यात वरचेवर येणे जाणे सुरू झाले होते.
अनेक अधिकाऱ्यांसोबत त्याची ओळख झाली. या ओळखीचा फायदा सुरेंद्र पाटीलने घेतला आणि थेट पोलीस अधिकारी यांच्या केबिनमध्ये जाऊन पोलीस अधिकारी यांच्या खुर्चीचा ताबा घेऊन व्हिडीओ शूट केले. हे व्हिडीओ त्याने इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर अपलोड केले. त्याच बरोबर त्याच्याकडील परवाना असलेले पिस्तुल नाचवताचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींनी पूल दुर्घटनेतील जखमींची केली विचारपूस
प्रकल्पांबाबत श्वेतपत्रिका काढून दूध का दूध…करणार?
पुलवामा हल्ल्यातील जवानांची थट्टा उडविणाऱ्याला ५ वर्षाची कैद
खोटे ‘सोने’ देऊन २० लाखांना फसवले
त्याचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी त्या व्हिडीओची दखल घेऊन सुरेंद्र पाटील यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल केले आहेत. एका गुन्ह्यात त्याच्या मर्सिडीज बेंज या मोटारीतून घातक शस्त्रे मिळाल्याचे म्हटले आहे, तर दुसऱ्या गुन्हयात त्याने पिस्तुल हातात घेऊन तसेच पोलीस ठाण्यात येऊन पोलीस अधिकारी यांच्या खुर्चीत बसून व्हिडीओ काढून ते व्हिडीओ स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावरवर अपलोड केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सुरेंद्र पाटील या बांधकाम व्यवसायिका विरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली असून त्याच्या जवळील परवाना असलेले पिस्तुल, पाच जिवंत काडतुसे, एक मर्सिडीज मोटार जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली. सुरेंद्र पाटील याला अटक करण्यात आलेली असून त्याचा शस्त्र परवाना रद्द करण्यात यावा यासाठी पत्र व्यवहार करण्यात आलेला असल्याचे गुंजाळ यांनी ‘न्यूज डंका’ शी बोलताना सांगितले.