संप काळात एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी हल्ला केला होता. याप्रकरणी ११८ एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते. परंतु, आता या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर रूजू करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या घराबाहेर आनंद साजरा केला आहे.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी ऑक्टोबर २०२१ पासून राज्यातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. हे प्रकरण अगदी उच्च न्यायलायत गेले होते. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी चिथावणीखोर भाषण केल्यानंतर एसटी कर्मचारी आक्रमक झाले होते. या संपूर्ण परिस्थितीला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला होता आणि त्यांनी शरद पवारांचं निवासस्थानी जाऊन चप्पल आणि दगडफेक केली होती.
एसटी संपाच्या काळात अनेक कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते. मात्र, एसटी संपाच्या काळात बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील आठवड्यात दिले होते. एसटी महामंडळ यांच्यासह मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिले. संप काळात जवळपास ११८ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांना आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना आठ महिन्यांनंतर पुन्हा कामावर घेतले जाणार असून त्याच्या पूर्वीच्याच जागी आणि पदावर कामावर त्यांना रुजू करुन घेतले जाणार आहे.
हे ही वाचा:
मुंबई, दिल्लीत दहशतवादविरोधी बैठक
इराणमधील महसा अमिनी प्रकरण जगासमोर आणणाऱ्या महिला पत्रकाराला अटक
ठाकरे गटाच्या मशालीवर ‘या’ पक्षाने केला दावा
उद्धव ठाकरेंच्या तीन नेत्यांवर गुन्हा दाखल
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर एसटी कर्मचारी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या निवासस्थानी गेले आणि आनंद साजरा केला. ढोल ताशांच्या गजरामध्ये गुलाल उधळत एसटी कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला आहे. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी मविआ सरकारवर आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.