राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत १ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्याचा निर्णय मुंबई सत्र न्यायालयाने दिला आहे. तसेच कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे या आरोपींच्याही न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरू आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांना ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये अनिल देशमुख यांना जरी जामीन मिळाला असला तरी त्यांच्यावर सीबीआयनेही आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात त्यांना अद्याप जामीन मिळाला नसल्याने त्यांना कोठडीतच राहावं लागणार आहे.
हे ही वाचा:
बाळासाहेबांच्या शिवसेनेला ‘ढाल तलवार’
पालघर साधू हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे
भाजपा शहराध्यक्ष भगीरथ बियांणींनी का केली आत्महत्या?
डी कंपनीच्या पाच जणांना घेतले ताब्यात
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दरमहा १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. या आरोपांनंतर देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ईडीकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी देशमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना २ नोव्हेंबर २०२१ रोजी अटक करून त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती. अनिल देशमुख हे मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगातच आहेत.