केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज, ११ ऑक्टोबर रोजी देशातील पहिली इथेनॉलवर चालणारी कार लॉन्च केली आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादवही उपस्थित होते. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ झाल्यानंतर या कारकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे. ही गाडी आल्यानंतर आता लोकांना दिलासा मिळणार आहे. पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉल आणण्याचाही केंद्र सरकारचा मानस आहे.
ही कार भारतीय बाजारपेठेत आल्यानंतर लोकांना याचा लाभ मिळेल कारण ती अतिशय स्वस्त आणि किफायतशीर असेल, तसेच पर्यावरणासाठीही फायदेशीर ठरणार आहे. टोयोटाने ही कार भारतात एक पायलट प्रोजेक्ट अंतर्गत फ्लेक्सी-इंधन मजबूत हायब्रिड इलेक्ट्रिक वाहने म्हणून लॉन्च केली आहे.
हे ही वाचा:
पालघर साधू हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे
भाजपा शहराध्यक्ष भगीरथ बियांणींनी का केली आत्महत्या?
डी कंपनीच्या पाच जणांना घेतले ताब्यात
गुगलने कान्होजी आंग्रे यांच्याबाबतीतली ‘ती’ चूक सुधारली
दिवसेंदिवस देशात पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत. या महागाईला पर्याय म्हणून देशात इथेनॉलचे उत्पादन केले जातं आहे. उसापासून इथेनॉल तयार होते. भारताचा ऊस उत्पादनात जगात पहिला क्रमांक लागतो. देशात उसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असल्याने इथेनॉलचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. यासाठी केंद्र सरकार इथेनॉलवर भर देत आहे. परिणामी इथेनॉलवर चालणारी वाहने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आल्याने इथेनॉलची मागणी वाढेल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढू शकेल असे सरकारचे म्हणणे आहे.