राहुल कृष्णा या २२ वर्षीय तरुणाची केरळमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली आहे. केरळच्या वायलार गावात ही घटना घडली आहे. राहुल हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघचा स्वयंसेवक होता. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी राहुलचा खून केल्याचा आरोप करण्यात येत आहे. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या वादग्रस्त अशा कट्टरतावादी इस्लामी संघटनेची राजकीय शाखा आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार रविवार भारतीय जनता पार्टीचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाजपाच्या विजय यात्रेसाठी केरळमध्ये आले होते. सोशल डेमोक्रॅटिक पार्टीने याविरोधात राज्यव्यापी आंदोलन घेण्याचे ठरवले. याचाच एक भाग म्हणून सोशल डेमोक्रॅटिक पार्टीने नागंकुलंगरा जिल्ह्यात एक सभा घेतली ज्यात भाजपा विरोधात आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्या. बुधवारीही अशीच एक सभा सोशल डेमोक्रॅटिक पार्टीतर्फे आयोजित करण्यात आली होती. या सभेत भडकाऊ भाषणे देण्यात आली ज्यावर संघाच्या स्वयंसेवकांनी आक्षेप घेतला. त्या रात्री सोशल डेमोक्रॅटिक पार्टीतर्फे एक प्रचारफेरीही काढली गेली. या फेरी नंतरच सोशल डेमोक्रॅटिक पार्टीच्या कार्यकर्त्यांनी संघ स्वयंसेवकांवर हल्ले केले ज्यात राहुल कृष्णा याची हत्या झाली.
या घटनेमुळे अलप्पुझा जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. गुरुवारी भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हाबंदीची हाक देण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी सोशल डेमोक्रॅटिक पार्टीच्या आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.