उद्धव ठाकरे अणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरू असून या मेळाव्याला येणाऱ्या शिंदे गटाच्या समर्थकांच्या खानपानाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या प्रसिद्ध दुकानातून अडीच लाख फूट पॅकेट्स देण्याची व्यवस्था केली आहे. त्या पॅकेट्ससाठी आता तयारी सुरू झाली असून ही सगळी पॅकेट्स प्रत्यक्ष मेळाव्याच्या वेळेला सर्वांना वितरित केली जातील.
त्यात ठेपले, धपाटे, कचोरी, गुलाबजाम असे पदार्थ समाविष्ट असणार आहेत. मात्र यावरून उद्धव ठाकरे गटाकडून टीका होत आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुद्दा उपस्थित केला आहे की, एकीकडे बेरोजगारी वाढली आहे आणि दुसरीकडे अशी पंचपक्वान्ने का वाटली जात आहेत.
महाराष्ट्राच्या इतिहासात शिवसेनेचे दोन ठिकाणी दसरा मेळावा पहिल्यांदाच होत आहे. दोन्ही गटांसाठी हा दसरा मेळावा प्रतिष्ठेचा झाला आहे. दसऱ्या मेळाव्याला राज्यभरातून हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत. दसऱ्या मेळाव्याला हेणारी अभूतपूर्व गर्दी लक्षात घेऊन मुंबई वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक निर्बंधांबाबत सूचना जारी केल्या आहेत. मेळाव्यासाठी मुंबईतल्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांनी बीकेसी, दादर आणि माहीममध्ये गर्दी टाळण्यासाठी निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध सकाळी ९ ते मध्यरात्री या कालावधीत असतील.
पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी आणि वांद्रे-वरळी सीलिंकवरून फॅमिली कोर्टमार्गे कुर्ल्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, वांद्रे-वरळी सीलिंक वरून बीकेसी मार्गे कुर्ल्याच्या दिशेने येणारी वाहने फॅमिली कोर्ट जंक्शनवरून यू-टर्न घेतील अणि जंक्शनपासून डावीकडे वळण घेतील व टी-जंक्शनवरून कुर्ल्याकडे जातील.
संत ज्ञानेश्वर रोडकडून बीकेसी इन्कम टॅक्स जंक्शनवरून कुर्ल्याकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.
संत ज्ञानेश्वर नगर येथून बीकेसी इन्कम टॅक्स जंक्शन मार्गे जाणारी वाहने गुरु नानक हॉस्पिटल- जगत विद्या मंदिर जंक्शन- कलानगर जंक्शन मार्गे आणि धारावी टी-जंक्शन मार्गे कुर्ल्याकडे जातील. त्याचप्रमाणे सरकारी कॉलनी, कनकिया पॅलेस आणि वाल्मिकी नगर येथून बीकेसी परिसरातून चुनाभट्टी आणि कुर्ल्याकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही असे वाहतूक पेलिसांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानात शैक्षणिक संस्थेत स्फोट; ४६ मुलींसह ५३ ठार
पोलीस महासंचालकांच्या हत्येची पीएएफएफ दहशतवादी संघटनेने घेतली जबाबदारी
जम्मू काश्मीरमध्ये पोलीस महासंचालकांची गळा चिरून हत्या
मुंबई विमानतळावरून ९.८ कोटींचे कोकेन जप्त
रज्जाक आणि सुर्वे जंक्शन येथून बीकेसी परिसरातून पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी आणि वांद्रे-वरळी सीलिंककडे जाणारी वाहने सीएसटी रोड, विद्यापीठाचे मुख्य गेट, आंबेडकर जंक्शन-हंस भुगरा जंक्शनमधून उजवीकडे वळतील आणि त्यांच्या गंतव्यस्थानाकडे जातील. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून बीकेसीमधील चुनाभट्टीमार्गे येणाऱ्या वाहनांना दक्षिणेकडील बीकेसी कनेक्टरचा वापर करून प्रवेश दिला जाणार नाही. चुनाभट्टीहून बीकेसीकडे जाणाऱ्या ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून जाणारी वाहने सायन सर्कल येथे उजवीकडे वळण घेतील आणि टी जंक्शन-कलानगर जंक्शन मार्गे त्यांच्या गंतव्यस्थानाकडे जातील.