31 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरविशेषहे राष्ट्र स्मारकांचे!

हे राष्ट्र स्मारकांचे!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलीकडच्या काळात देशभरात अनेक प्रतिष्ठित स्मारके स्थापन केली आहेत.

Google News Follow

Related

आज, १७ सेप्टेंबर रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस दिवस आहे. गेल्या आठ वर्षपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची जागतिक स्तरावर मोठी प्रतिमा निर्माण केली आहे. जागतिक पातळीवर मोठा दबदबा निर्माण करून देशाला त्यांनी स्वयंपुर्तीकडे नेलं आहे. देशात असं कोणतेही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रात देशाची प्रगती झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलीकडच्या काळात देशभरात अनेक प्रतिष्ठित स्मारके स्थापन केली आहेत. ब्रिटिश राजवटीनंतर देशात पहिल्यांदाच असं घडलंय की, कोणतेही स्मारक उभारण्यात सरकार सक्रियपणे सहभागी होत आहे. यापैकी काही स्मारके ही पंतप्रधान मोदींची दीर्घकाळापासूनची स्वप्न आहेत. ज्यात जगातील सर्वात उंच स्मारक, स्टॅच्यू ऑफ युनिटी, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकांचा समावेश आहे.

२०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून, मोदी सरकार देशाचे रक्षण करत असलेल्या जवानांचे नेहमीच कौतुक करतात. १९६२ मधील भारत-चीन युद्ध, १९४७, १९६५ आणि १९७१ मधील भारत-पाक युद्ध आणि १९९९ च्या कारगिल संघर्षात लढलेल्या आपल्या सैनिकांचे कौतुक करण्यासाठी, पंतप्रधानांनी शहीद वीरांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय युद्ध स्मारक राष्ट्राला समर्पित केले. राष्ट्रीय युद्ध स्मारक दिल्लीच्या मध्यभागी जवळपास चाळीस एकर जागेवर पसरलेले आहे. यामध्ये अमर चक्र, वीरता चक्र, त्याग चक्र आणि रक्षक चक्राचा समावेश आहे. तसेच वीरमरण आलेल्या तब्बल २५ हजार ९४२ सैनिकांची नावे त्या युद्ध स्मारकावर कोरली आहेत. राष्ट्रीय युद्ध स्मारक फेब्रुवारी २०१९ रोजी बांधले गेले. तसेच नुकतंच जानेवारी २०२२ मध्ये अमर जवान ज्योती आतापासून राष्ट्रीय युद्ध स्मारकात प्रज्वलित करण्यात येईल अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली होती.

गुजरातमधील केवडीया येथे असलेले स्टॅच्यू ऑफ युनिटी जगातील पर्यटकांचा आकर्षणाचे केंद्र आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी हे भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा सुमारे १८२ मीटर उंच पुतळा आहे. पटेल यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त अंदाजे दोन हजार कोटी रुपये खर्च करून पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर देशाला एकत्र आणण्यासाठी पटेल आणि त्यांचे योगदान केवळ लक्षात ठेवायचे नाही तर जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्याचा पंतप्रधान मोदींचा उद्देश होता. अलीकडे, मोदींनी असा दावा केला होता की, न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षाही जास्त लोक स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देतात. पंतप्रधान मोदींच्या पुढाकाराने गुजरातमधील केवडिया एक छोटेशे गाव जगातील सर्वात मोठ्या पर्यटन स्थळांपैकी एक बनले. केवडिया हे अर्थव्यवस्था आणि पर्यावरण या दोन्हींचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास कसा करता येईल याचे एक उत्तम उदाहरण आहे.

हैदराबादमध्ये असलेल्या स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीने काही महिन्यांतच प्रसिद्धी मिळवली आहे. देशात समतेचा पुतळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामानुजाचार्य यांच्या २१६ फुटी पुतळ्याचे पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले. या पुतळ्याचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्या ठिकाणी यज्ञ केले होते. हे यज्ञ देशाच्या १३० कोटी जनतेला समर्पित करण्यात आले होते. रामानुजाचार्य यांनी जात, पंथ यासह जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये समानतेचा विचार पसरवला. ते एक भारतीय हिंदू तत्वज्ञानी, गुरु आणि समाजसुधारक होते. ते हिंदू धर्मातील श्री वैष्णव परंपरेतील सर्वात महत्त्वाचे प्रतिपादक म्हणून ओळखले जातात. त्यांचे हे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी उभारण्यात आले. त्यांचा जन्म जरी दक्षिणेत झाला असला तरी त्यांचा प्रभाव संपूर्ण देशावर आहे.

नुकतंच मोदी सरकारने आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात भारतातील व्यक्ती आणि संस्थांनी केलेल्या अमूल्य योगदानाची आणि निःस्वार्थ सेवेची ओळख, सन्मान करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याची स्थापना केली. पंतप्रधान मोदींनी जानेवारी २०२२ ला नेताजी सुभाषचंद्र बोस होलोग्राम पुतळ्याचे अनावरण केले. होलोग्राम पुतळा २८ फूट उंच आणि ६ फूट रुंदीचा आहे. सुभाषचंद्र बोस यांची जयंती दरवर्षी २३ जानेवारीला असते. त्यांचा दरवर्षी सन्मान करता यावा म्हणून भारताचा प्रजासत्ताक दिनाचा उत्सव २४ जानेवारी ऐवजी २३ जानेवारीला सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली.

महाराष्ट्राचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक अरबी समुद्रात बांधण्याची योजना प्रस्तावित आहे. मरीन ड्राईव्हच्या समोरील मुंबई किनारपट्टीपासून सुमारे दीड किमी आतमध्ये महाराजांच्या स्मारकाचे अनावरण करण्यात येणार आहे. या स्मारकासाठी ३ हजार ६०० कोटी रुपये खर्च येणार आहे. शिवाजी महाराजांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी जवळपास २१२ मीटर उंच त्यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे.

जगातील सर्वात उंच स्मारक उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथे बनणार आहे. हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान राम यांचा पुतळा युपीमध्ये उभारला जाणार आहे. हा पुतळा प्लिंथ आणि छत्रीसह २५१ मीटर उंच असणार असून तो जगातील सर्वात उंच पुतळा असणार आहे. जगातील उंच पुतळा बनणार असल्याने सहाजिकच संपूर्ण जगात तो आकर्षणाचा केंद्र बनणार आहे. या पुतळ्यासाठी अंदाजे अडीच हजार कोटी रुपये खर्च येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कर्नाटक सरकारने बेंगळुरू जवळील मुथ्यालय येथील धबधब्याजवळ स्वामी विवेकानंदांचा १२० फूट उंचीचा पुतळा उभारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार हा पुतळा गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर असणार आहे. याही पुतळ्याचे प्राथमिक काम सुरु झालं आहे.

शांततेचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्‍वरजी महाराज यांचे स्मारकसुद्धा राजस्थानमध्ये बनवले जात आहे. जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्‍वर जी महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ मीटिंगद्वारे राजस्थानच्या पाली येथे ‘शांततेच्या पुतळ्याचे’ अनावरण केले. १५१ इंच उंच पुतळाअष्टधातु म्हणजे आठ धातूपासून बनविला गेला आहे.

देशात भगवान हनुमानजी यांचा चार धाम प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पामध्ये देशातील चार ठिकाणी चार भगवान हनुमानजीचे पुतळे उभारले जाणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी हनुमान जयंतीनिमित्त गुजरातमधील मोरबी येथे हनुमानाच्या १०८ फूट उंचीच्या मूर्तीचे व्हिडिओ मीटिंगद्वारे अनावरण केले होते. चार धाम प्रकल्पाचा भाग म्हणून देशातील चार भागात उभारण्यात येणाऱ्या चार मूर्तींपैकी ही दुसरी आहे. यातील पहिली मूर्ती देशाच्या उत्तरेला शिमलामध्ये आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट, सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्प २०१९ मध्ये जाहीर केला होता आणि डिसेंबर २०२० रोजी त्यांनी या संरचनेची पायाभरणी केली होती. या प्रकल्पाचा उद्देश जागतिक दर्जाची सार्वजनिक जागा म्हणून परिसराचा पुनर्विकास करणे, सांस्कृतिक संस्थांना बळकट करणे आणि महत्वाचं म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाचे स्मरण करणे हे आहे. नवी दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा परिसरात राष्ट्रपती भवन, संसद भवन, नॉर्थ आणि साउथ ब्लॉक, इंडिया गेट यासह इतर इमारती आहेत. ही जागा मुळात ब्रिटीश वसाहत काळात बांधली गेली होती आणि नंतर स्वातंत्र्यानंतर भारतीय सरकारने ती राखून ठेवली होती.

२०१४ पासून पंतप्रधान मोदी देशासाठी अनेक कामे करत आहेत. यामध्येच तेव्हापासून देशात अनेक क्रातिकारकांची स्मारके व्हावीत यासाठी मोदी नेहमीच प्रयत्नशील आहेत. स्मारकांचे अनावरण होत असताना अनेकांनी देशाचा पैसा वाया जात आहे किंवा स्मारके बांधून काय होणार अशी टीका केली जात होती. पण स्मारकांच्या किंवा पुतळ्याच्या मागे मोदी सरकारचे अनेक उद्देश होते. देशाचे पर्यटन वाढावे यातील मुख्य हेतू आहे. कारण अनेक देशांच्या अर्थव्यवस्था या फक्त पर्यटनावर अवलंबून असतात. एवढा देशाला पर्यटनाचा फायदा होतो आणि देशात पर्यटन आले की स्वछता ही आलीच त्यामुळे स्वच्छ भारत अभियानालाही गती मिळेल त्यासोबतच देशात रोजगारही वाढेल आणि भारताची अर्थव्यवस्थाही मजबूत होईल.

सर्वसामान्यांचा विचार करणारे नेतृत्व देशाला लाभले आहे. आज देशातील जनतेचा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे, त्यांच्या हातात देशाच्या सीमा सुरक्षित आहेत, गरीब सशक्त होत आहेत, महिला सशक्त होत आहेत. तरुणांना हवे ते भविष्य घडविण्याची ताकद मिळत आहे, भ्रष्ट, दहशतवादी आणि त्यांचे आश्रयदाते यांच्यात भीतीचे वातावरण आहे. पंतप्रधान मोदींनी देशाची राजकीय संस्कृतीच बदलून टाकली आहे. आज देशात योजनांची केवळ घोषणाच होत नाही तर त्यांची कालबद्ध अंमलबजावणीही होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा