आज रविवारचा दिवस साधून गणेश भक्तांनी मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यास रात्रीपासूनच गर्दी केली होती. मात्र, रात्रीपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे गणेश भक्तांची त्रेधा उडाली. परेल ते भायखळा या मार्गावर भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. दरम्यान वाहतूक पोलीस अधिकारी, कर्मचारी सेवा बजावल्याने अनेक अडचणी दूर झाल्याचे दिसून आले. मात्र तरीही अनेक भाविकांनी गर्दी पाहून गणेशाचे दर्शन न घेताच निघून गेल्याचेही चित्र दिसले.
काल रात्रीपासूनच मुंबई शहरात पावसाने हजेरी लावली होती. लालबाग येथील मुंबईच्या राजाचे, लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी तुडूंब गर्दी होती. दर्शन घेण्यासाठी आलेले कुटुंबीय बाप्पासोबत सेल्फी घेण्याचा आनंद लुटत होते. हा मार्ग गणेश भक्तांनी अगदी गजबजून निघाला होता. त्यामुळे या मार्गावर एकेरी वाहतूक सुरु होती. मात्र, पावसाने जोरदार लावलेल्या हजेरीने पहाटे भाविकांचा थोडा हिरमोड झाला. मात्र, पावसाचा ओघ ओसरताच पुन्हा त्या भागात भाविकांची गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. नुकतेच मुंबईचे भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी लालबागच्या राजाच दर्शन घेतलं आहे. तसेचं केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा हेसुद्धा सकाळी लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहचले होते.
हे ही वाचा:
भारतीय अर्थव्यवस्था येत्या सात वर्षात जगात तिसऱ्या क्रमांकावर
म्हणून बायबल हाती धरण्यास दादाभाई नौरोजींनी दिला होता नकार
सिनेमांच्या पात्रात श्रीगणेश, मनाला पटते का?
‘केरळमध्ये काम करण्यासाठी देशभक्तीबरोबरच बलिदान आणि शौर्यही हवे’
आज गौरी पूजन असून पहाटेपासूनच मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसानं हजेरी लावली आहे. तसेच आज पाच दिवसांच्या गणरायचंही विसर्जन होणार आहे. आज दिवसभर मुंबईत पाऊस असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.