गेल्या काही वर्षांपासून चीनी सरकार उइगर मुस्लिमांच्या मागे हात धुवून लागले आहे. त्यामुळे उइगर मुस्लिमांचा सरकारसोबत लपंडाव सुरु आहे. उइगर मुस्लिमांचा छडा लावण्यासाठी ‘अलिबाबा’ कंपनी नवे सॉफ्टवेअर विकसित करत आहे. ‘फेस रेकग्निशन’ प्रणालीचा वापर या सॉफ्टवेअर मध्ये प्रामुख्याने होणार आहे. अलीबाबा कंपनी उइगर मुस्लिम आणि इतर अल्पसंख्यांकांना दुय्यम वागणूक देत असल्याची चर्चा आहे. कंपनीच्या ‘क्लाऊड कॉप्युटिंग सर्विस’ च्या माध्यमातून फोटो आणि विडिओ द्वारे या अल्पसंख्यांकांची माहिती मिळू शकते, असा दावा करण्यात आला आहे.
शिनजियांग प्रांतातील उइगिरांना जबरदस्ती कॅंप्स मध्ये बंदी बनवल्याचा आरोप चीनवर कायमच होत आला आहे. चीन ही गोष्ट अस्वीकार करतो आणि त्या कॅंप्सना सुधारगृह किंवा प्रशिक्षण केंद्र म्हणते. पण जगातील मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या मते या कॅंप्स मध्ये जवळपास १० लाख उइगिरांना डांबून ठेवण्यात आले आहे. ‘द न्यू यॉर्क टाइम्स ‘ या अमेरिकेतील महत्वाच्या वृत्तसंस्थेने या विषयीचे वृत्त दिले आहे. अलीबाबा कंपनीने आरोप झिडकारले आहेत. या विषयापासून दूर राहण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.