बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम थांबवण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. औरंगाबादेतील महात्मा गांधी कॅम्पसमधील प्रियदर्शनी उद्यानामधील अनेक झाडं तोडून स्मारक उभं करण्याची योजना आहे.
औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील देशमुख आणि न्यायमूर्ती अहुजा यांनी हे आदेश दिले आहेत. प्रियदर्शनी उद्यानातील झाडं तोडून स्मारक उभं करण्याच्या योजनेला अनेक पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शवला होता. प्रियदर्शनी बचाव मोहीम सुरु करण्यात आली होती. याची दखल घेत न्यायालयाने कामाची पाहणी केली आणि अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. अहवालानंतर औरंगाबाद खंडपीठ पुढील निर्णय देणार आहे.
हे ही वाचा:
प्रियदर्शनी उद्यानातील १२१५ झाडे गेली कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. वृक्षतोड रोखण्यासाठी याआधी जनहित याचिका दाखल केलेली होती. बांधकाम करत असताना मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते परंतु याचे पुनर्रोपण केले जात नसल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिले होते.
आरे कॉलनीतल्या मेट्रो कारशेडला वृक्षतोडीवरुन स्थगिती देणाऱ्या शिवसेनेवर दुटप्पीपणाचा आरोप करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे विद्यमान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आरे कारशेड प्रकरणात तीव्र विरोध दर्शवला होता. औरंगाबादमधील १७ एकरचे प्रियदर्शिनी उद्यान आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या औरंगाबाद महापालिकेत या परिसरातील झाडांची कत्तल केल्यामुळे आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण प्रेमाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.