मिती फिल्म सोसायटी आयोजित दुसऱ्या मिती शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये ‘मेक अ विश’ला सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मचे पहिले पारतोषिक मिळाले. ‘उन्मुक्त’ला दुसरे तर ‘ॲम आय ऑडिबल’ या शॉर्ट फिल्मला तिसरे पारितोषिक प्राप्त झाले आहे. पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सभागृहात पार पडलेल्या दिमाखदार समारोहात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी एमएनजीएलचे डायरेक्टर कमर्शियल संजय शर्मा, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, मिती फिल्म सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद लेले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावर्षी भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष श्रेणी अंतर्गत झालेल्या स्पर्धेत ‘पनाही’ या शॉर्ट फिल्मला विशेष पारितोषिक मिळाले. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्मचे पारितोषिक रिमूव्हेबल या अमेरिकन शॉर्ट फिल्मला तर परीक्षकांचे विशेष पारितोषिक ‘ट्यून ऑफ लाईफ’ या शॉर्ट फिल्मला प्राप्त झाले.
दरवर्षी मिती फिल्म सोसायटीच्या वतीने मिती शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन होते. यंदा १३ व १४ ऑगस्ट रोजी या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी तब्बल १० राज्यांमधून व ७ देशांमधून शंभरहून अधिक शॉर्ट फिल्मस् या फेस्टिवलसाठी आल्या. राधिका इंगळे, आशिष केसकर व धनेश पोतदार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
परीक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना आशिष केसकर म्हणाले “दुसऱ्याच वर्षी १०० पेक्षा अधिक फिल्मस् येणे ही मोठी गोष्ट आहे. मिती फिल्म सोसायटीचे हे यश आहे. आलेल्या बहुतांश शॉर्ट फिल्मस् या उत्तम दर्जाच्या होत्या. कमी वेळात अधिक आशय योग्य पद्धतीने मांडायचा प्रयत्न सर्वांनी केला होता. व्हिज्युअल स्क्रिप्टिंगकडे अधिकाधिक लक्ष देण्याची आवश्यता आहे. सामाजिक विषय हे या व्यासपीठाचे मोठे अंग आहे. मात्र ते मांडत असताना सर्व घटकांचा विचार करून, विद्यमान धारणांना छेद देताना सजग राहून मांडणी केली पाहिजे.”
हे ही वाचा:
पुलवामात दोन दहशतवाद्यांना टिपणाऱ्या देवेंद्र प्रताप सिंह यांना कीर्ती चक्र
‘भ्रष्टाचार आणि घराणेशाही नष्ट करू’
विधान परिषद आमदारकी फुटकळ आहे का ?
देशाचे पाऊल लवकरच ५ जी मोबाईल युगाकडे
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यावेळी बोलताना म्हणाले, “शॉर्ट फिल्मस् बनवणाऱ्यांना व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल मिती फिल्म सोसायटीचे अभिनंदन व धन्यवाद. चित्रपट हे माध्यमच मुळात दृश्य माध्यम आहे. नाटक हे श्राव्य माध्यम आहे. जोपर्यंत तुम्हाला शब्दांशिवाय दृश्य दाखवता येईल तोपर्यंत दाखवा. जेव्हा अगदीच आवश्यक असेल तेव्हाच शब्दांचा आधार घ्यावा.” स्क्रीनप्लेचे महत्त्व सांगताना गोखले यांनी आल्फ्रेड हिचकॉकचा दाखला दिला. शॉर्ट फिल्म करताना उद्देश डोक्यात असण्याचे महत्त्व विषद करताना ते पुढे म्हणाले, “आपण ही फिल्म का करतोय याविषयी आपल्या मनात स्पष्टता हवी. आपल्या मुलांना पाश्चात्य सिनेमापेक्षा भारतीय सिनेमा आधी माहिती हवा. आजच्या तरुणांना चांगले प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. त्यामुळे या संधींचा अधिकाधिक उपयोग करून घ्या. मात्र कोणत्याही प्रयत्नांना लगेच यश मिळेल असे नाही. संयम हवा.”
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक ऋषि मनोहर यांना ‘मेक अ विश’ या शॉर्ट फिल्मसाठी, सर्वोत्कृष्ट लेखनासाठी ऋषि मनोहर यांना ‘मेक अ विश’ या शॉर्ट फिल्मसाठी पारितोषिक देण्यात आले. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठी प्रवीण मोहन (कोरोना गो), सर्वोत्कृष्ट संगीतासाठी तनाओ एचडी (एरोलनुंदगी), सर्वोत्कृष्ट संकलनासाठी सुधीश सिवसंकर (द स्टुडंट), सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी बियांका कर्स्टन (मेक अ विश) व गितांजली कुलकर्णी (गोष्ट अर्जुनची) यांना विभागून, सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी सुव्रत जोशी यांना ‘गोष्ट अभि अनूची’ या शॉर्ट फिल्मसाठी व शिवराज वायचळ यांना ‘गोष्ट अर्जुनची’ या शॉर्ट फिल्मसाठी विभागून देण्यात आले.
दोन दिवसीय मिती शॉर्ट फिल्म फेस्टिवलची सुरुवात काल दुपारी प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांच्या हस्ते झाली. उद्घाटन सत्रानंतर निवडक शॉर्ट फिल्मस् चे प्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर शॉर्ट फिल्म मेकर्ससाठी मार्केटिंग व आंतरराष्ट्रीय संधी याविषयावर एक पॅनल डिस्कशन आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये मयूर हरदास, मनोज कदम, उषा देशपांडे यांनी भाग घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. केशव साठ्ये यांनी सूत्रसंचालन केले. शॉर्ट फिल्मचे कल्चर भारतात अधिकाधिक प्रमाणात रुजवण्याची आवश्यकता त्यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. आज सकाळी साडेनऊ वाजता शॉर्ट फिल्म स्क्रिनिंगने सुरुवात झाली. त्यानंतर विख्यात चित्रपट दिग्दर्शक प्रसाद नामजोशी यांचा दिग्दर्शन या विषयावर मास्टर क्लास झाला. शॉर्ट फिल्म करण्यापूर्वी कथा सांगण्याची तळमळ असणे महत्त्वाचे आहे, त्या तळमळीतूनच उत्तम शॉर्ट फिल्म तयार होते असे नामजोशी यांनी यावेळी सांगितले. संपूर्ण फेस्टिवलला उपस्थितांनी भरपूर प्रतिसाद दिला.