मनी लॉड्रिंग प्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडून क्लीन चीट मिळालेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) माजी विभागीय संचालक IRS समीर वानखेडे यांनी मलिक यांच्याविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गोरेगाव पोलिसांनी मलिक यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला असून त्यामुळे नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडून समीर वानखेडे यांनी दिलासा मिळाला आहे. समीर वानखेडे हे जन्माने मुस्लीम नसून समीर वानखेडेंच्या वडिलांनी हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लीम धर्माचा स्वीकार केल्याचे सिद्ध होत नाही, असे समितीने म्हटले आहे. समीर वानखेडे हे जन्माने मुस्लीम आहेत आणि त्यांनी बोगस जात प्रमाणपत्र सादर करून मागासवर्गीय कोट्यातून सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता.
या प्रकरणी क्लीन चीट मिळताच समीर वानखेडे यांनी रविवार, १४ ऑगस्ट रोजी दलित व्यक्तीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून नवाब मलिक यांच्याविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गोरेगाव पोलिसांनी मलिक यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान तसेच अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे.
हे ही वाचा:
एकनाथ शिंदेंकडे नगरविकास तर फडणवीसांकडे अर्थ व गृह
स्टॉक मार्केटमधील ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन
नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांच्या आवळल्या मुसक्या
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास सहन करावा लागला होता. यासाठीच त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. समीर वानखेडे यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये मलिक यांचा जावई समीर खान याला ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. “त्याच रागातून मलिक यांनी निरर्थक आरोप करत मला व माझ्या कुटुंबियांना त्रास दिला आहे. मलिक यांनी भाषण आणि पत्रकार परिषदांमध्ये वानखेडे यांच्या जातीबद्दल वारंवार वक्तव्ये केली. त्यामुळे वानखेडे यांचे कुटुंब निराशेच्या गर्तेत गेले,” असे वानखेडे यांनी एफआयआरमध्ये नमूद केले आहे.