25 C
Mumbai
Thursday, November 28, 2024
घरराजकारणमंत्रिमंडळाच्या विस्तारात मिठाचा खडा

मंत्रिमंडळाच्या विस्तारात मिठाचा खडा

मंत्रिमंडळात संजय राठोड यांचा समावेश केल्यामुळे नाराजी

Google News Follow

Related

महाराष्ट्रात अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार तब्बल महिन्याभराने झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदल्या दिवशी जवळपास अडीच तास चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्तारावर शिक्कामोर्तब झाले आणि पहिल्या टप्प्यात १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या या आनंदी क्षणी मिठाचा खडा पडला तो या मंत्रिमंडळात बलात्काराचा आरोप असलेल्या संजय राठोड यांचा समावेश करण्यात आल्यामुळे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात वनमंत्री असलेले संजय राठोड हे बदनाम ठरले होते. पूजा चव्हाण या तरुणीचे लैंगिक शोषण करून तिच्या मृत्यूस कारणीभूत असल्याच्या संशयावरून भारतीय जनता पक्षाने संजय राठोड यांच्याविरोधात रान उठविले. विशेषतः भाजपाच्या नेत्या आणि उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या प्रकरणात संजय राठोड यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली. प्रकरणही गंभीरच होते. अर्थात महाविकास आघाडीने राठोड यांना वाचविण्याचा प्रयत्न केलाच. पण शेवटी राठोड यांना राजीनामा द्यावा लागला.

पूजा चव्हाण ही तरुणी सोशल मीडियावर एक्टीव्ह असल्याचे बोलले जात होते. तिने ७ फेब्रुवारी २०२१ला आपल्या घराच्या गॅलरीतून उडी मारली आणि त्यात तिचा मृत्यू झाला. पण नंतर ती आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप होऊ लागला. चित्रा वाघ यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जात माहिती मिळविली. तिचे आणि संजय राठोड यांचा एकमेकांशी संपर्क होता, त्यांच्यात संभाषणे होत होती, अशी माहितीही तेव्हा समोर येऊ लागली. पूजा चव्हाणने गर्भपातही केला असल्याचीही माहिती समोर आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले होते. अनेक ऑडिओ क्लिपही समोर आल्या होत्या. त्यातून संजय राठोड यांच्याभोवतीचे संशयाचे धुके अधिकच दाट होत गेले. शेवटी संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला.

अशी कलंकित वाटचाल करणाऱ्या संजय राठोड यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये स्थान मिळाल्यामुळे अर्थातच धक्का बसणे स्वाभाविकच आहे. चित्रा वाघ यांनी तर भाजपाच्या नेत्या असतानाही या सरकारमध्ये राठोड यांचा केलेला समावेश हा दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. पूजाच्या मृत्युला कारणीभूत असलेल्या राठोडचा समावेश केल्यामुळे आपल्याला दुःख झाल्याचे त्या म्हणाल्या. पण आपला राठोडाविरोधातला लढा सुरूच राहणार, आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. लडेंगे और जितेंगे असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

या सगळ्या परिस्थितीत शिंदे-फडणवीस सरकारने कलंकित असलेल्या संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात का समावेश केला, याविषयी जनमानसातही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शेवटी भाजपा आणि शिवसेना या युतीलाच लोकांनी २०१९मध्ये कौल दिला होता. पण नंतर राजकारणाचे चित्र पालटले आणि महाविकास आघाडीचे सरकार आले. आता मात्र एकनाथ शिंदे यांनी आपला वेगळा गट तयार केल्यानंतर पुन्हा एकदा लोकांच्या मनात असलेली युतीच सत्तेवर आली आहे, अशी महाराष्ट्राच्या जनतेत भावना आहे. असे असताना त्यात राठोड यांच्यासारख्या एका बदनाम मंत्र्याचा समावेश करण्याची मजबुरी नेमकी काय होती, असा लोकांना प्रश्न पडणे स्वाभविक आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधी हीच का तुमची लोकशाही ?

खेळाडूंची पुढची पिढी तयार होतेय, ‘तो’ व्हिडीओ बघून आनंद महिंद्रांची प्रतिक्रिया

बिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीशकुमार सत्तेतून बाहेर

जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा होतोय जल्लोषात ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा

 

महाविकास आघाडी सरकारच्या विस्कळीत कारभारावर लोक प्रचंड नाराज होते, त्यामुळे आता आलेल्या शिंदे- फडणवीस सरकारबद्दल लोकांच्या मनात समाधानाची भावना आहे. लोकांचे समर्थनही या नव्या सरकारला आहे. अशा वेळी राठोड यांचा समावेश करून या सरकारला अपशकुन करण्याची नेमकी आवश्यकता काय होती, असा सवाल लोकांकडून विचारला जात आहे. चित्रा वाघ यांची ही प्रतिक्रिया ही जनमानसाची भावनाच आहे.

महाराष्ट्रात आज महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढतेच आहे. अशावेळी महिलांसाठी सुरक्षित वातावरणाची ग्वाही देणे हे सरकारचे काम असते, तशी अपेक्षा लोक ठेवून असतात. निदान सरकारमध्ये तरी महिलांच्या बाबतीत बलात्कार, लैंगिक शोषण असे गंभीर आरोप असलेल्या व्यक्तिंचा समावेश असू नये, अशी लोकभावना असते आणि ती अगदी योग्यही आहे. मग संजय राठोड यांचा अगदी पहिल्या टप्प्यात समावेश करण्याची गरज का होती, असा प्रश्न स्वाभाविकपणे विचारला जातो. याची उत्तरे शिंदे-फडणवीस सरकारला द्यावी लागणार आहेत. केवळ राजकारणासाठी असे केले जाते, यावर विश्वास ठेवून राठोड यांच्यावरील आरोपांवर पांघरूण घालता येणार नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुणे पोलिसांनी केलेल्या तपासाअंती राठोड यांना क्लिन चीट देण्यात आली होती. पण शिंदे-फडणवीस सरकारने अशा कलंकित मंत्र्यांची पाठराखण न करता आपण जनतेच्या हिताचा विचार करणारे सरकार देणार आहोत, अशी खात्री द्यायला हवी, असे जर लोकांना वाटत असेल तर त्यात त्यांचे काय चुकले?

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
200,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा