महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर राजकीय गणित बदलली आहेत. बदलांची ही प्रक्रिया अजून सुरू आहे. या दरम्यान नवी राजकीय समीकरणे जुळून आलेली असली तरी आपलं दुकान सुरू राहील यासाठी महाविकास आघाडीचे अनेक नेते प्रयत्नशील आहेत. काही दिवसांपूर्वी माजी मंत्री आणि मालवणीचे आमदार अस्लम शेख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट हा त्याचाच भाग होता. भेटीसाठी भाजपा नेते मोहीत कंबोज यांनी मध्यस्थी केली होती. या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. विशेषत: संघ परीवारातील कार्यकर्त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला होता. महाविकास आघाडीचे सरकार ही एक लुटारू टोळी होती. गेली अडीच वर्षे महाराष्ट्राला जमेल तसे ओरबाडण्याचा प्रयत्न आघाडीतील प्रत्येक नेता करीत होता. अस्लम शेख हे त्यातले आघाडीचे नाव.
मालवणीत बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी घुसखोरी केल्याचा आरोप संघ परिवारातील अनेक नेत्यांनी केला आहे. लव्ह जिहादच्या घटनाही इथे मोठ्या संख्येने घडल्या आहेत. अजूनही घडतायत. मालवणीतून होणाऱ्या हिंदूंच्या पलायनाच्या मूळाशी हेच कट्टरवादी आहेत. एखाद्या इमारतीत हिंदूंची संख्या कमी झाली, तर तिथे इमारतीच्या कंपाऊंडमध्ये नमाज सुरू होतो. हिंदू मुलींची छेडछाड, विनयभंग हे प्रकार नित्याचेच. काही काळाने उरलेसुरले हिंदूही तिथून पळ काढतात. मालवणीतील अनेक मोकळ्या जमिनींवर इथे झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. इथे जेव्हा कट्टरवादी काही कांड करतात, तेव्हा अस्लम शेख यांचे त्यांच्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये फोन जातात, अशी स्थानिक भाजपा नेत्यांची तक्रार आहे.
जेव्हा फडणवीस यांना अस्लम शेख भेटले तेव्हा हिंदुत्ववाद्यांचा जो तीळपापड झाला, त्याची पार्श्वभूमी ही अशी आहे. या भेटीनंतर अस्लम शेख यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे मोडीत काढण्यात येतील, फडणवीस त्यांना अभय देतील, त्यांना माफी मिळेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. लोक मोहित कंबोज यांच्या नावाने ठणाणा करीत होते. कंबोज यांना ही उठाठेव करायला कोणी सांगितले होते, असा सवाल उपस्थित करीत होते. परंतु शिंदे- फडणवीस सरकारने एका प्रकरणात अस्लम शेख यांना दणका दिल्यानंतर हा गैरसमज दूर झाला आहे. अस्लम शेख यांच्या भेटीनंतर समाज माध्यमांमध्ये आणि माध्यमांमध्ये गदारोळ उडाला असताना फडणवीस यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नव्हती. ते एका शब्दानेही बोलले होते. परंतु हजार कोटींच्या जमीन घपल्याबद्दल पर्यावरण खात्याने नोटीस काढल्यानंतर फडणवीसांच्या मनात काय आहे, त्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. ही फडणवीसांची खास स्टाईल आहे. ते न बोलता बरंच काही बोलून जातात.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकी आधी राज्यात भाजपाची हवा आहे, हे पाहून अस्लम शेख यांनी भाजपामध्ये उडी मारण्याचा प्रय़त्न केला होता. परंतु संघ परिवारातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या भाजपा प्रवेशाला कडाडून विरोध केला. त्यामुळे शेख भाजपावासी व्हायचे राहिले. परंतु नंतर नशीबाचे फासे त्यांच्या बाजूने पडले. निवडणुकीत ते जिंकून आले, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते मंत्री सुद्धा झाले.
गेल्या अडीच वर्षांच्या काळात मढ-मालवणीमध्ये जमीन हडपण्याचे काम जोरात सुरू झाले. इथली बरीच जमीन दलदलीची, तिवरांची आहे. बरीच जमीन सीआरझेड अंतर्गत येते. या जमिनीवर कब्जा करून तिथे भले मोठे स्टुडीयो ठोकण्यात आले. हा सुमारे हजार कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला.
२४ फेब्रुवारी २०२१ रोजी मढ मधील एरंगळ गावात हे तीन स्टुडीयो उभारण्याची परवानगी देण्यात आली होती. ही परवानगी फक्त सहा महिन्यांसाठी होती. शूटींग पूर्ण झाल्यानंतर ही बांधकामे हटवण्यात यावी, अशी अट घालण्यात आली होती. ऑगस्ट २०२१ मध्ये सहा महिन्यांचा काळ पूर्ण झाला. परंतु आता त्या मुदतीनंतर १२ महिने उलटले तरी ही बांधकामे अजून तशीच आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. मंत्री पदाच्या जोरावर हा मामला निस्तरण्याची शेख यांची योजना होती. परंतु सरकार गेले आणि मंत्री पद सुद्धा. शेख यांना दणका बसला आणि त्यांच्या स्टुडीयोंना सुद्धा.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा बाजार उठल्यानंतर ज्या लगबगीने शेख यांनी फडणवीसांची भेट घेतली, त्यामागे असेच काही घोटाळे होते. त्यात स्टुडीयो घोटाळा सगळ्यात मोठा. नव्या सरकारने या स्टुडीयोच्या विरोधात कारवाई केली तर शेख यांना मोठा आर्थिक फटका बसणार होता. त्यामुळेच २०१९ मध्ये केलेला प्रयत्न फसल्यानंतर शेख यांनी आणखी एक कोलांटी मारण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्नही फसल्याचे दिसत असून महाराष्ट्राच्या पर्यावरण विभागाने मालवणीतील या २८ स्टुडीयोच्या विरोधात नोटीस काढली आहे.
हे ही वाचा:
ममता बॅनर्जींचा आदेश दोन खासदारांनी धुडकावला!
व्यापाऱ्याने केला पुण्यातील तरुणीवर मुंबईत बलात्काराचा प्रयत्न
नुपूर शर्मांना समर्थन देणाऱ्या प्रतीक पवारवर असा झाला होता हल्ला
ही नोटीस शेख यांच्या विरोधातील कारवाईची केवळ सुरूवात आहे. राजकीय सोयीप्रमाणे कोलांट्या मारता येणार नाहीत. मतलबाचा एजेंडा राबवता येणार नाही. असे स्पष्ट संकेत या नोटीशीमुळे अस्लम शेख यांना मिळाले आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी फक्त भेट दिली, अभय नाही ही बाब या नोटीशीमुळे पुरेशी स्पष्ट झालेली आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सत्तारुढ झालेल्या शिंदे फडणवीस सरकारने हे हिंदुत्ववादी सरकार असल्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही संदिग्धता न ठेवता हे सरकार हिंदुत्ववादी असेल असे स्पष्ट केले होते. उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या अखेरच्या बैठकीत औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यात येईल, असा प्रस्ताव मंजूर केल्याची घोषणा केली होती. परंतु अस्लम शेख तेव्हा त्या बैठकीतून बाहेर पडले होते. त्यांनी या प्रस्तावाबाबत काहीच माहीत नसल्याचे मीडियाला सांगितले होते. यातून शेख यांना या नामकरणाला विरोध असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले होते. शेख यांची भूमिका हिंदुत्वाच्या विरोधात असल्यामुळे त्यांना सांभाळून घेणे, नव्या सरकारला परवडणार देखील नाही. त्यांना दणका देऊन असा काही इरादाही नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. अस्लम शेख यांच्या चुकीला माफी नाही.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)