मुलाला अटक होणार या विचाराने शोकाकूल झालेली शिवसेना नेते संजय राऊत यांची आई काल मीडियामुळे लोकांनी पाहिली. आई ही आई असते. मुलगा खड्ड्यात पडतोय हे पाहून तिच्या काळजाला चटका लागणे स्वाभाविक आहे. पण संजय राऊतांच्या मातोश्री एका बाबतीत सुदैवी आहेत. कारण मीडियाला त्यांचे अश्रू दिसले. वेदना जाणवल्या. सत्तेच्या टाचेखाली संजय राऊतांनी ज्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. अशा महिलांची संख्या मोठी आहे. त्यांचा टाहो मीडियाला कधी ऐकू आला नसला तरी त्यांच्याच तळतळाटामुळे ही परिस्थिती संजय राऊतांवर ओढवलेली आहे.
सत्ता अनेकांच्या डोक्यात भिनते, अशी माणसं वाहवत जातात. आपण ब्रह्मदेव असल्याची भावना त्यांच्या मनात रुजायला लागते. ही भावना काही काळ येऊन जाऊन असते, नंतर मात्र ती कायमस्वरुपी ठाण मांडते. राऊतांचा नेमका हाच प्रॉब्लेम झाला. कानात सत्तेचा वारा शिरलेल्या खोंडाप्रमाणे ते उधळले होते. त्यांना रोखण्याचे सामर्थ्य उद्धव ठाकरे यांच्याकडे कधीच नव्हते. कारण त्यांना शरद पवारांचा आशीर्वाद होता. संजय राऊत यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने ईडीच्या कार्यालयासमोर निदर्शने करून स्पष्ट केले की ते शिवसेनेत असले तरी पवारांचे मानसपुत्र आहेत.
अटक होण्याच्या दोन दिवस आधी राऊतांची एक ऑडीयो क्लीप व्हायरल झाली. एका महिलेला ते शिवीगाळ करतायत. जिला शिवीगाळ करतायत ती महिला मराठी आहे. तिने कॉलर पकडल्याच्या मुद्यावरून राऊत तिच्या आई-बहिणीचा उद्धार करतायत. कुठल्याशा जमीनीच्या वादावरून तिला धमकावतायत. राऊतांचे अभिजात मराठी आणि त्यांचा भेसूर चेहरा या ऑडीयो क्लीपने समोर आणला. ही महिला कोण, याचा अंदाज महाराष्ट्रातील जनता लावू शकते.
शिवीगाळ करणे हा बहुधा राऊतांना पुरुषार्थ वाटत असावा. यापूर्वी अनेकदा त्यांनी या पुरुषार्थाचे दर्शन घडवले आहे. शिव्या फक्त आपल्यालाच देता येतात, या भ्रमातून शिव्या देण्याचा सपाटा राऊतांनी गेल्या काही महिन्यात लगावला होता.
सत्तेचा वापर करून सतत दुसऱ्याच्या घराला आग लावण्याचे धंदे राऊतांनी केले. कंगनाच्या घरावर बुलडोजर चालवला. उद्या सत्ता गेल्यावर ही वेळ आपल्यावरही येऊ शकते याचा विचार केला असता तर कदाचित ही अवस्था झाली नसती.
‘सामना’तील ‘उखाड दिया’ हा मथळा लोकांच्या आजही लक्षात आहे. कंगना तुमच्या सरकारच्या विरोधात बोलली म्हणून तुम्ही तिच्या घरावर नांगर फिरवलात. सत्तेची ताकद एका महिलेला दाखवलीत. लोक बोलत नाहीत, पण लक्षात ठेवतात. कंगनाची संपत्ती वाटमारीची आणि टक्केवारीची नव्हती. ती कष्टाची संपत्ती होती. तिची हाय राऊतांना लागणारच होती.
बोगस डीग्रीच्या मुद्यावरून सपना पाटकरला ५२ दिवस तुरुंगात डांबण्यात आलं. या बाई त्याच होत्या, ज्यांनी वारंवार राऊतांवर आरोप केले. आपल्यावर पाळत ठेवण्यात येत आहे, पाठलाग होतोय, आपल्याला धमक्या दिल्या जातायत. पण एका महीलेने कंठशोष करून देखील राऊतांवर साधी एनसी दाखल झाली नाही. महाविकास आघाडीवर राऊतांची पकड अशी जबरदस्त होती, की एका महीलेला चिरडणे काय मोठी बाब होती.
एके काळी सामनामध्ये कॉलम चालवणाऱ्या, बाळकडू या सिनेमाच्या सहनिर्मात्या असलेल्या बाईंशी एकदम फाटण्याचे कारण काहीही असू शकेल, पण त्यांना धडा शिकवण्यासाठी राजसत्तेचा वापर झाला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलिस तर सुपारी घेतल्यासारखे वागत होते. सत्ताधाऱ्यांची चाकरी करत होते. तारतम्य सोडून धरपकड करत होते, तुरुंगात डांबत होते. सत्ते पुढे शहाणपण नसते, पण सत्ता कायमची कधीच कोणाची नसते.
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी कुटुंबाचा मानसिक छळ रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवल्यानंतर हेच संजय राऊत होते ज्यांनी विचारले होते, ‘तिचा काय संबंध? तिच्यावर कोणी टीका केलेली नाही.’ पुढे ते म्हणाले होते, ‘मराठी मुलगी आहे, तिच्यावर अन्याय होणार नाही. आज बाळासाहेब ठाकरे नसले तरी उद्धव ठाकरे आहेत’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. तेच उद्धव ठाकरे हे समीर वानखेडे याच्या आई-वडीलांचा उद्धार करणाऱ्या नवाब मलिकला ‘गुड गोईंग’ अशी कौतुकाची थाप देत होते.
नवाब मलिक हे वानखेडे यांच्या दिवंगत आईचे आणि वडीलांचे वाभाडे काढत होते, क्रांती रेडकर यांच्या बहीणीवर घाणेरडी शेरेबाजी करत होते, परंतु तरीही राऊत यांना ही टीका वैयक्तिक वाटत नव्हती, की तिच्यावर झालेला अन्याय वाटत नव्हती. खासदार नवनीत राणा यांनी मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केली, म्हणून तुम्ही त्यांना १४ दिवस तुरुंगात डांबले. महिलांना तुम्ही सतत असल्या मर्दपणाचे दर्शन घडवत होता.
हे ही वाचा:
बनावट नोटा छापण्यामागे सुशिक्षित तरुणांचं ‘कनेक्शन’
शरद पवारांचा हात आणि नेते तुरुंगात!
संजय राऊतांना चार दिवसांची ईडी कोठडी
रोकड प्रकरणी झारखंडच्या तीन काँग्रेस आमदारांवर झाली ‘ही’ कारवाई
मनसुख हिरेनचा मृतदेह मुंब्र्याच्या खाडीत सापडल्यानंतर, ‘त्याच्या मृत्यूचे भांडवल करू नका’, असे कोरडे आणि कोडगे विधान राऊतांनी केले. केतकी चितळेच्या प्रकरणात शरद पवारांना सूर्य, हिमालय ठरवणारे आणि केतकीला शुद्र किटक, नशेबाज म्हणणारे राऊतच होते. राऊत सत्तेच्या नशेच इतके चूर होते की त्यांची संवेदना पार संपुष्टात आली होती. महीलांच्या बाबतीत त्यांची विधाने तर त्यांची माणूसकी संपल्याचे दाखवून देत होती. त्यांना मनसुख हिरनच्या पत्नीचा टाहो ऐकू आला नाही. ५२ दिवस तुरुंगात खितपत पडलेल्या सपना पाटकरच्या, कंगनाच्या, क्रांति रेडकरच्या कोणाच्याच वेदना त्यांना समजल्या नाहीत. दुर्दैवाने मीडियानेही त्या दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु त्याच मीडियाला संजय राऊतांच्या आईचे अश्रू दिसले.
हे अश्रू दुसऱ्या कोणाचे नाही तर राऊतांचेच कर्तृत्व आहे. पत्राचाळीतील सुमारे ७०० कुटुंबाना देशोधडीला लावणाऱ्या राऊतांना एका स्वातंत्र्य सैनिकाच्या थाटा ओवाळून घ्यायला आणि ते शूट करायला लाज वाटायला हवी होती. भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांना अटक होत असतानाही त्यांनी आईला वेठीला धरले. इतक्या लोकांना रडवल्यावर ते अश्रू तुमच्या वाट्याला येणार नाही अशी अपेक्षा कशी करता येईल. दुसऱ्यांच्या घरात आग लावणाऱ्यांचे घर किती काळ सुरक्षित राहणार?
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)