शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून रविवार, ३१ जुलै रोजी सकाळीच त्यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालं आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचं अधिवेशन असल्याचं सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. तसेच त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. त्यानंतर आज ईडीचं पथक थेट संजय राऊत यांच्या घरी पोहचलं आहे.
ईडीचे काही अधिकारी आज सकाळीच संजय राऊत यांच्या घरी पोहोचले आहेत. या पथकासोबत सुरक्षा रक्षक असून त्यांनी संजय राऊत यांच्या घराबाहेर पहारा सुरू ठेवला आहे. कुणालाही आत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
संजय राऊत हे सध्या त्यांच्या कुटुंबियांसोबत घरी आहेत. अनेक प्रकरणांमध्ये त्यांची आज चौकशी होण्याची शक्यता आहे. ईडीने दोनदा संजय राऊत यांना समन्स बजावलं होतं.
हे ही वाचा:
तिस्ता सेटलवाड आणि श्रीकुमार यांना दिलासा नाहीच
यंदा राखी खरेदीसाठी बहिणींना मोजावे लागणार ज्यादा पैसे
अविनाश भोसलेचे ‘हेलिकॉप्टर’ सीबीआयने आणले जमिनीवर
सीसीटीव्हीमुळे पकडले गेले दोन सराईत मोबाईल चोर
२० जुलै रोजी, ईडीने संजय राऊत यांना मुंबईच्या उपनगरातील चाळ प्रकल्पाच्या पुनर्विकासाशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी त्यांनी पुढची तारीख मागितली होती. मात्र, त्यांचा अपील त्यावेळी फेटाळण्यात आला होता. त्यानंतर ईडीने नवीन समन्स जारी करून राऊत यांना २७ जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले होते.