लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात ऑनलाइन इन्स्टंट लोन अँप्स तयार करून भारताला आर्थिक कोंडीत फसविण्याचा चीनचा इरादा असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बोगस लोन अँप्स प्रकरणी
मुंबईच्या सायबर गुन्हे शाखेच्या हाती एक आंतरराष्ट्रीय मोठी टोळी लागली आहे. देशभरातून अटक करण्यात आलेल्या १४ जणांच्या या टोळीत एक चीनी नागरिक देखील असल्याचे समोर आले आहे. लोन अँप्सच्या माध्यमातून या टोळीने मुंबईसह देशभरात हजारो कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
या फसवणुकीसाठी सुमारे ३५० बँक खात्यांचा वापर केला गेला असून हजारो कोटी रुपये क्रिप्टो करन्सीमध्ये रूपांतर करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी एकूण ३५० बँक खाते गोठवले असून या खात्यामध्ये १४ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
लियांग ची शेंग (३९), ओवेज सलीम अहमद (२९), विपुल शंकर गौडा (२४), स्नेह समीर सोमानी (३०), संजय वीर भान अरोरा (२८), विघ्नेश आनंद (२८), मल्लय्या चिक्कनव्या कुरुबा (२४), अजयकुमार अरुणकुमार (२५), प्रियांशी शेखरचंद्र कांडपाल (२४) व इतर पाच असे अटक करण्यात आलेल्या १४ जणांच्या टोळीतील आरोपींची नावे आहेत. या १४ जणांना मुंबई, बेंगलोर, उत्तराखंड, गुडगाव, कोलकत्ता आणि दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे. ही टोळी ‘ऑनलाइन इन्स्टंट लोन अँप्स’ च्या माध्यमातुन सामान्य जनतेची आर्थिक फसवणुक व मानसिक छळ करून त्यांच्याकडून वसुली करणारी १४ गुन्हेगारांची आंतराष्ट्रीय टोळी असल्याची माहिती सायबर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लॉकडाऊनच्या काळात या बोगस लोन अँप्सचा सुळसुळाट झाला होता, गरजवंत, गरिबांना तात्काळ ऑनलाईन कर्ज देण्याचे अमिष दाखवले जात होते. त्यासाठी हे लोन अँप्स मोबाईल फोनमध्ये डाउनलोड करून सर्व या बोगस कंपन्या मोबाईल फोन धारकाचा संपूर्ण माहितीचे एक्सेस मिळवुन आपल्या जाळ्यात अडकवून त्यांची फसवणूक करीत होते.
या टोळीकडून मुंबईसह देशभरातील नागरिकांची फसवणूक करण्यासाठी बोगस कागदपत्रांच्या आधारे ३६० बँक खात्याचा वापर करण्यात आलेला असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या टोळीने २०० पेक्षा अधिक ऑनलाइन लोन अँप्स तयार करून इंटरनेटच्या माध्यमतुन गरजूंना आणि गरिबांना लोन अँप्सच्या जाळ्यात ओढून त्यांचा आर्थिक आणि मानसिक छळ केला जात होता.
या प्रकरणी मुंबई पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्याने दाखल केलेल्या गुन्ह्यात तक्रारदाराने त्याच्या आईच्या वैद्यकीय उपचाराकरीता व वैयक्तिक गरजांकरीता अशा प्रकारचे एकुण १० लोन अँप्सद्वारे ३ लाख ८५ हजार रुपये इतक्या रक्कमेचे कर्ज घेतले होते. त्याने लोनच्या परताव्यापोटी आतापर्यंत २२ लाख इतकी रक्कम लोन कंपन्यांना परत केली, ही रक्कम धमक्या, मॉर्फ केलेले अश्लिल फोटो व्हायरल होण्याच्या बदनामीच्या भितीने भरली आहे. तरी देखील या कंपन्यांचा हव्यास पुर्ण न झाल्याने त्यांचे धमकावणे सुरुच होते. या त्रासाला कंटाळुन पीडीताने पोलीसांत तक्रार दिली. या गुन्ह्याच्या तपासात प्राप्त तपशीलाचे तांत्रिक विश्लेषण करुन नमुद गुन्हयात एकुण १४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
“गावातलं गढूळ पाणी आम्हाला प्यावं लागत असताना अजित पवारांसाठी बॉटल?”
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षण सोडत
महाराष्ट्रात तपास करण्यासाठी सीबीआयला घ्यावी लागणार परवानगी
नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; सतर्क राहण्याचा इशारा
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान सर्व अटक आरोपींकडून एकुण २११ सिमकार्ड, ३९ मोबाईल, १९ लॅपटॉप्स् व २ हार्डडिस्क, १ एस एस डी, ३ राऊटर, सिम कार्ड लपविण्यासाठीची दोन पुस्तके मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तसेच बनावट कंपन्यांची व इतर अशी ३६० पेक्षा जास्त बँक खाती गोठविण्यात आली. या खात्यात १४ कोटी पेक्षा जास्त रक्कम शिल्लक आहे.