जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या अडचणीत वाढ होणार असून त्यांच्यावर जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील (जेकेसीए) आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने आरोपत्र दाखल केले आहे. या आरोप पत्रात जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यासह मीर मंजूर गझनफर, अहसान अहमद मिर्झा आणि इतरांची नावे आहेत. आरोपपत्रात नावे असलेल्या सर्व व्यक्तींना २७ ऑगस्ट रोजी हजर राहण्यासाठी न्यायालयाने नोटीस बजावली आहे.
ईडीकडून हे आरोपपत्र ४ जून रोजी दाखल करण्यात आले होते. परंतु, श्रीनगरमधील विशेष न्यायालयाने मंगळवार, २६ जुलै रोजी त्याची दखल घेतली. त्यानंतर आरोप पत्रात नाव असलेल्या सर्वांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जेकेसीएला दिलेल्या अनुदानातील कथित अनियमिततेशी संबंधित हे प्रकरण आहे. २०१९ मध्ये जेकेसीएच्या पदाधिकाऱ्यांसह इतर अनेक व्यक्तींच्या वैयक्तिक बँक खात्यांमध्ये निधी हस्तांतरित झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात ईडीने आतापर्यंत ५१.९० कोटी रुपयांच्या अफरातफरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. त्यापैकी आतापर्यंत २१.५५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे, अशी माहिती समोर आली आहे.
“२००६ ते जानेवारी २०१२ दरम्यान, डॉ. फारूख अब्दुल्ला जेकेसीएचे अध्यक्ष होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी जेकेसीएमधील पदाधिकाऱ्याच्या बेकायदेशीर नियुक्ती करून त्यांच्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केला. त्यांनी या पदाधिकाऱ्यांना जेकेसीए निधीची अफरातफर करण्याच्या उद्देशाने आर्थिक अधिकार दिले. तपासात असेही दिसून आले आहे की, डॉ. फारूख अब्दुल्ला हे जेकेसीएच्या निधीचे महत्त्वपूर्ण लाभार्थी होते,” असे ईडीने एका निवेदनात म्हटले आहे.
हे ही वाचा:
औषध, वैद्यकीय उपकरणे खरेदीला स्थगिती आदेश लागू नाही
मध्य प्रदेशातही ‘सर तन से जुदा’चा प्रकार?
सिव्हील इंजिनिअर डिप्लोमा केलेल्यांना कंत्राटदार नोंदणीसाठी हिरवा कंदील
‘खोबरे गेले करवंटी हातात राहिली आतातरी शहाणे व्हा’
फारुख अब्दुल्ला यांची या प्रकरणात यापूर्वीही अनेकदा चौकशी करण्यात आली आहे. २०२०मध्ये, ईडीने या प्रकरणात अब्दुल्लांचा गुपकर रस्त्यावरील बंगला आणि जम्मूतील काही मालमत्ता जप्त करण्यात आली होती.