मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला केले संबोधित
मी आपल्या देशाच्या जिवंत लोकशाही व्यवस्थेच्या शक्तीला सलाम करतो, असे उद्गार मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले. मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ आज रविवारी २४ जुलै रोजी मध्यरात्री संपुष्टात येणार आहे. तत्पूर्वी, सायंकाळी त्यांनी देशाला केलेल्या आपल्या अखेरच्या संबोधनात भारतीय लोकशाहीला सलाम केला.
पाच वर्षांपूर्वी माझी तुम्ही निवडलेल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून राष्ट्रपतीपदी निवड झाली होती. आज माझा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. मी तुम्हा सर्वांचे, तुमच्या लोकप्रतिनिधींचे मनस्वी आभार मानतो. तुम्ही निष्ठावान नागरीक व देशाचे निर्माते आहात, असे राष्ट्रपती कोविंद म्हणाले. माझ्या ५ वर्षांच्या कार्यकाळात मी माझ्या क्षमतेनुसार माझी कर्तव्ये पार पाडली. डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. एस. राधाकृष्णन व डॉ. एपीजे अब्दुल कलाम सारख्या महान व्यक्तिमत्त्वांचा उत्तराधिकारी म्हणून मी अत्यंत दक्षपणे कामकाज केले, असे ते म्हणाले.
आपल्या मुळाशी असणारे घट्ट नाते आपल्या भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. मी तरुण पिढीला विनंती करेन की, त्यांनी त्यांच्या गावाशी किंवा शहराशी आणि त्यांच्या शाळा व शिक्षकांच्या कायम संपर्कात राहण्याची परंपरा कायम ठेवावी. आपला देश २१ व्या शतकाला भारताचे शतक बनविण्यास सक्षम असल्याचा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रपती असताना मूळगावी भेट देणे व कानपूरच्या माझ्या शाळेतील वृद्ध शिक्षकांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचा पदस्पर्श करणे हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण होता असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
समाजातील सर्व वर्गांकडून मला सहकार्य आणि आशीर्वाद मिळाला आहे. माझी भेट जेव्हा जवानांशी होत होती तेव्हा त्यांच्यात देशप्रेमाची भावना ओतप्रोत भरलेली असल्याचे दिसत असे. देशाप्रती असलेल्या प्रेमाची जाणीव त्यांच्या भेटीत होत असे. अनेक असाधारण प्रतिभाशाली लोकांशी भेटण्याची संधी राष्ट्रीय पुरस्कार वितरणावेळी मिळत असे.
लहानपणही मला आठवते. छोट्या गावात मी जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. नुकतेच देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. मी देखील देशाच्या वाटचालीत योगदान देईन असे वाटत असे. त्यावेळी राष्ट्रपतीपदाबद्दल आमच्या कुटुंबात माहिती असण्याची शक्यता नव्हती. पण कानपूर जिल्ह्यात एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेलो मी आज देशाला संबोधित करतो आहे. एकूणच लोकशाहीचा हा विजय आहे. राष्ट्रपती झाल्यानंतर माझ्या गावाला भेट दिली. कानपूरच्या शाळेला भेट देणे आणि गुरुजनांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेणे या माझ्या जीवनातील अविस्मरणीय घटना आहेत. पंतप्रधान माझ्या गावाला आले तेव्हा माझा सन्मान वाढविला. आपले गाव, नगर, विद्यालय शिक्षकांशी सतत जोडले जाणे आवश्यक आहे.
भारतीय राज्यघटना दीपस्तंभ
संविधान सभेत संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक मान्यवरांमध्ये हंसाबेन मेहता, दुर्गाबाई देशमुख, राजकुमारी अमृत कौर व सुचेता कृपलानी सारख्या १५ महिलांचा समावेश होता. संविधान सभेच्या सदस्यांच्या अमूल्य योगदानातून निर्माण झालेली भारतीय राज्यघटना हा आपला दीपस्तंभ आहे. १९ व्या शतकात देशात ब्रिटीशांविरोधात अनेक उठाव झाले. या उठावांतील अनेक स्वातंत्र्यवीरांची नावे विस्मरणात गेली होती. आता त्यांच्या शौर्यगाथा आदराने स्मरण केल्या जात आहेत, असे राष्ट्रपती म्हणाले.
हे ही वाचा:
बनावट सोने गहाण ठेवून बँकेची फसवणूक
शी शी !! नशेसाठी चक्क कंडाेम उकळतात, त्याचे पाणी पितात!
पंतप्रधान माेदींचे चारित्र्यहनन करणारा व्हिडीओ आप, काँग्रेसकडून व्हायरल
सोशल मीडियावर तरुणाला २५ लाखांचा गंडा
गांधींनी देशाला नवी दिशा दिली
१९१५ मध्ये गांधीजी मायदेशी परतले तेव्हा देशभक्तीची भावना प्रबळ होत होती. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे एखाद्या ऋषीप्रमाणे देशाची सेवा करत होते. तर डॉक्टर भीमराव आंबेडकर देशातील जनतेला समतेची जाणीव करून देत होते. असे वातावरण त्यावेळी विकसित देशांमध्येही नव्हते. गांधींनी त्या काळात आपल्या विचारांनी देशाला नवी दिशा दिली. संविधान स्वीकारण्यापूर्वी आंबेडकर म्हणाले होते की, आपण केवळ राजकीय लोकशाहीवर समाधानी राहू नये. आपण राजकीय लोकशाहीचे रूपांतर सामाजिक लोकशाहीत केले पाहिजे, असेही राष्ट्रपती कोविंद यावेळी म्हणाले. तत्पूर्वी, रविवारी सकाळी कोविंद यांनी राजघाटावर जावून महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.
हवामान बदलामुळे आपल्या ग्रहाच्या भविष्यापुढे एक गंभीर धोका
आपल्या संबोधनात हवामान बदलावरही भाष्य करताना राष्ट्रपती कोविंद म्हणाले की, हवामान बदलामुळे आपल्या ग्रहाच्या भविष्यापुढे एक गंभीर धोका उत्पन्न झाला आहे. त्यामुळे आपण आपल्या मुलांसाठी पर्यावरण, आपली जमीन, हवा व पाणी यांचे संवर्धन केले पाहिजे.