बनावट सोने तारण ठेवून राष्ट्रीयकृत बँकेची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना रत्नागिरीत घडली आहे. सुवर्णकाराने बनावट सोने तारण ठेवून हा व्यवहार केला आहे. त्यामध्ये बँकेच्या दोन शाखांमध्ये ४९ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी १० जणांवर गुन्हा नोंदवला असून, सोने तारण ठेवून कर्ज घेतलेल्या ग्राहकांचा शोध घेतला जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील कारवांचीवाडी पाठोपाठ आता एमआयडीसी शाखेतही ४९ लाखांपेक्षा अधिक कर्जव्यवहार केल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी रश्मी दिनेश कुजूर यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी एमआयडीसी शाखेमध्ये कार्यरत असणारे रजिस्टर्ड व्हॅल्युअर अधिकारी प्रदीप सागवेकर यांना बनावट दागिन्यांची माहिती असून सुद्धा त्यांनी ९ जणांना सोने तारण ठेवण्यास सहकार्य केले. एकूण ४९ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा:
सोशल मीडियावर तरुणाला २५ लाखांचा गंडा
अक्षय कुमार सर्वाधिक कर भरणारा अभिनेता
परिचारिका असल्याचे भासवून एक दिवसाच्या बाळाचे अपहरण
WHO कडून ‘मंकीपॉक्स’ जागतिक आणीबाणी म्हणून घोषित!
या प्रकरणामध्ये तपासणीअंती एमआयडीसी शाखेमध्ये तब्बल ९ जणांनी बनावट सोनेतारण ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे. पाच जणांनी एमआयडीसी शाखेमध्ये गैरव्यवहार केल्याचे आढळून आले आहे. रत्नागिरी शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथील बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये २२ लाख ८० हजारांचे बनावट सोने तारण कर्ज व्यवहार झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी सुवर्णकारासह चारजणांना ताब्यात घेतले असून, एक आरोपी फरार आहे.