पुरस्कार दरवर्षीच मिळत असतात.पण या वर्षी जरा जास्तच पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे. वास्तविक राष्ट्रीय पुरस्कार हा अंतिम असतो पण तरीही अशाच प्रकारे खूप चांगले विषय शोधत राहायचे आणि चांगले संगीत, चांगल्या संकल्पनांना वाहिलेल्या चित्रपटांची निर्मिती करणे ही आता जबाबदारी या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या निमित्ताने निर्माण झाली आहे, अशा भावना प्रसिद्ध अभिनेते जयवंत वाडकर यांनी व्यक्त केल्या आहेत. ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या घोषणेमध्ये वाडकर यांच्या ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा मोठा आनंद झाला असल्याचे वाडकर यांनी म्हटले आहे.
६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली असून प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. तर बेस्ट फिचर फिल्ममध्ये मराठीत ‘गोष्ट एका पैठणीची’ ची निवड झाली आहे. राहुल देशपांडे यांना ‘मी वसंतराव देशपांडे’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गायकाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. स्पेशल ज्युरी अवॉर्ड मराठीतील ‘जून’ या चित्रपटासाठी सिद्धार्थ मेननला मिळाला आहे. तर ‘अवांछित’ आणि ‘गोदाकाठ’ या चित्रपटातील भूमिकांसाठी अभिनेते किशोर कदम यांना विशेष सन्मान मिळाला आहे. ‘टकाटक’ या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी अनिष मंगेश गोसावीला बाल कलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपती कोविंद यांना फेअरवेल डिनर
बजरंग दलाने कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयावर लिहिले हज हाऊस
चीनमध्ये बँकिंग संकट; नागरिकांना रोखण्यासाठी बँकांसमोर रणगाडे तैनात
पंतप्रधान मोदींनी घेतली द्रौपदी मुर्मू यांची भेट
मराठी चित्रपट आणि कलाकारांनी यावर्षी पुरस्कारामध्ये मारलेली बाजी नक्कीच अभिमानास्पद आहे. सर्वोत्तम चित्रपट म्हणून माझ्या ‘गोष्ट एका पैठणीची’ निवड झाली आहे. खूपच आनंद आहे. मी आतापर्यंत केलेल्या चित्रपटांमध्ये एका चित्रपटाची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड होणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. हा पुरस्कार मिळणे यात सर्वांचीच मेहनत आहे, असेही वाडकर म्हणाले.
पुरस्कारांतून नवीन विषयांची ऊर्मी मिळते
अशा पुरस्कारांमधून एक प्रकारे ऊर्जा मिळते त्यातून अजूनही नवनवीन विषयावर चित्रपट करण्याची ऊर्मी मिळते. निखिल रोडे माझ्या चित्रपटाचा दिग्दर्शक होता. या सर्वांची मेहनत आहे. मला नवीन लोकांबरोबर काम करायला आवडते. या सगळ्यांची मेहनत इतकी आहे की ते वेगवेगळे विषय सहज हाताळतात. त्यावर मेहनत करून अशा चित्रपटांची निर्मिती करणे खूप मोठी गोष्ट आहे. त्यातून दक्षिण, उत्तर अशा वेगवेगळ्या राज्यांमधून आपल्या चित्रपटाची निवड होणे ही खूुपच मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आता जबाबदारी वाढली असल्याच्या भावना जयवंत वाडकर यांनी व्यक्त केल्या आहेत.