पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गेल्या दहा दिवसांपासून गायब असलेला अरुण राठोडला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळत अरुण राठोडला ताब्यात घेतले. आता याप्रकरणात त्याची चौकशी केली जाईल. अरुण राठोडची चौकशी थेट पोलीस आयुक्तालयात होण्याची शक्यता आहे.
चौकशी अहवालात अरुण राठोडचा महत्वाचा भाग आहे. अरुण राठोडच्या नावाने व्हायरल रेकॉर्डिंगचा अहवालात उल्लेख आहे. यवतमाळ प्रकरणातही अरुण राठोड नामक व्यक्ती असल्याने संशय बळावला. पोलीस अहवालात विजय चव्हाणही सोबत असल्याचा उल्लेख आहे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकारी करणार आहेत. याप्रकरणात एकूण तीन पथके चौकशी करत आहेत. या अगोदर पूजाच्या आई वडिलांचा जबाबही घेण्यात आला आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही. आकस्मिक मृत्यूचीच नोंद पोलीस दप्तरी आहे.
दरम्यान, काल पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला होता. पूजा अरुण राठोड नावाच्या तरुणीचा यवतमाळच्या रुग्णालयात गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ही पूजा अरुण राठोड कोण? पूजा अरुण राठोड हिचा पूजा चव्हाणशी काय संबंध? पूजा अरुण राठोड हीच पूजा चव्हाण आहे का? कथित मंत्र्याने आपल्या जिल्ह्यातील रुग्णालयात हा गर्भपात घडवून आणलाय का? असे अनेक प्रश्न उपस्थित राहिले.
पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंधीत काही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत. त्या त्याच प्रकरणाशी संबंधित आहेत का, याचाही खुलासा किंवा माहिती ना पोलिसांनी दिली, ना पूजाच्या कुटुंबियांनी. पण त्यात एक व्यक्ती प्रकरण दाबण्यासाठी काही सूचना देत असल्याचे पुढे आले आहे.