आज, १९ जुलैला संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. यादरम्यान, आज संसदेत विरोधकांचा गदारोळ पाहता लोकसभा अध्यक्षांनी लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब केले आहे. यावेळी सभागृहातील सदस्यांवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संतापले आणि त्यांनी सदस्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. राज्यसभेतही गदारोळ झाल्यानंतर सभापतींनी सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब केले आहे.
सभागृहात सकाळी ११ वाजता प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या सदस्यांनी महागाईच्या मुद्द्यावरून सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. बिर्ला यांनी सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले, मात्र त्यांनी ऐकले नाही. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे कठोर झाले. गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना सल्ला देताना ते म्हणाले की, दुटप्पी वृत्ती चालणार नाही. विरोधी पक्षाचे सदस्य शेतकरी आणि महागाईच्या प्रश्नावर सभागृहाबाहेर बोलतात आणि सभागृहात चर्चेत भाग घेत नाहीत. सभागृहाच्या आत आणि बाहेर विरोधी सदस्यांची दुहेरी वृत्ती चालणार नाही.
हे ही वाचा:
उदयपूरनंतर आता बिहारमध्ये नुपूरप्रकरणी एका तरुणाला भोसकले
…पण उद्धव म्हणाले, राष्ट्रवादीची साथ सोडणार नाही!
लहानगीने मुख्यमंत्र्यांना विचारलं, सुट्टीत गुवाहाटीला फिरायला घेऊन जाणार का?
गेल्या अधिवेशनात महागाईवर सभागृहात चर्चा झाल्याचे लोकसभा अध्यक्षांनी सांगितले. तेव्हा विरोधकांनी महागाईवर चर्चाही केली नाही. आजही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रश्न उपस्थित केले जात असले तरी सरकारला प्रश्न विचारण्याऐवजी विरोधक गदारोळ करत आहेत. सभासदांनी केवळ नियमांचे पुस्तक हातात ठेवू नये, ते पुस्तक वाचून त्यानुसार वागावे, असा सल्लाही यावेळी ओम बिर्ला यांनी दिला आहे.