राज्यात शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादी आणि अजित पवारांना चांगलाच दणका दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नगरविकास विभागाच्या ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती दिली आहे. यामध्ये पुण्यासह बारामती नगरपरिषदेला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला होता. त्यामुळे अजित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने विभागांना मंत्री मिळालेले नाही. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या मार्च ते जून २०२२ मध्ये मंजूर झालेल्या ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुणे आणि बारामतीमधील काही कामांना स्थगिती मिळाली आहे. विशेष म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुचवलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. तर शिवसेनेच्या आमदारांनी सुचवलेल्या कामांना मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अभय दिलं आहे.
हे ही वाचा:
इंडिगो विमानाचे कराचीत इमर्जन्सी लँडिंग
इंडोनेशियामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू
ठाणे शहराला अतिरिक्त पाण्यासाठी मंजुरी
मंजूर झालेल्या ९४१ कोटींपैकी एकट्या बारामती नगरपरिषदेला २४५ कोटींचं वितरण कऱण्यात आलं होतं. मात्र, आता बारामतीतल्या कामांना स्थगिती मिळाल्याने हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना अजित पवार निधी देत नाहीत, अशी तक्रार अनेक आमदारांनी केली होती. निधी वाटपावरूनही अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती.