ब्रिटनमध्ये सुरुवातीला आरोग्य सचिव साजिद जाविद आणि अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दोन वरिष्ठ मंत्र्यांनी पाठोपाठ राजीनामे दिल्यामुळे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे तेव्हाच अडचणीत आले होते. प्रशासनातून बाहेर पडणाऱ्यांची संख्या ५० हून अधिक झाल्यामुळे जॉन्सन यांच्यावरही राजीनाम्याची वेळ आली. सामान्य जनता कोरोना आणि निर्बंधांशी लढत असताना जॉन्सन सरकारमधले काही मंत्री आणि अधिकारी दारूच्या पार्ट्या करत होते. या प्रकरणावेळीही जॉन्सन यांनी राजीनामा द्यावा अशा मागणीने जोर धरला होता. जॉन्सन बोरिस यांचा पंतप्रधान पदाचा प्रवास हा वादग्रस्तच राहिला आहे. वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्यांना जवळ करणं किंवा जवळची कोणी व्यक्ती वादग्रस्त प्रकरणात अडकली असेल तर संपूर्ण यंत्रणा वापरून त्या व्यक्तीचा बचाव करायचा, त्याचं समर्थन करायचं असले प्रकार अनेकदा घडल्यामुळे जॉन्सन यांची प्रतिमा बिघडत गेली होती.