आमदार शंभुराज देसाई आणि आमदार संदीपान भुमरे यांचे वक्तव्य
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आणि त्यांनी भाजपासोबत सरकार स्थापन केलं. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे आमदार हे आपापल्या मतदार संघात गेले आहेत. यावेळी प्रतिक्रिया देताना काही आमदारांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
“शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली होती,” असा गंभीर आरोप माजी गृहराज्यमंत्री आमदार शंभुराज देसाई यांनी नाव न घेता केला आहे. शिवसेनेचे आमदार वारंवार याबाबत उद्धव ठाकरेंना सांगत होते पण त्यांनी ऐकलं नाही, असंही शंभुराज देसाई म्हणाले.
“आमचे अनेक नेते सांगतात की, कोणीतरी उद्धव ठाकरेंच्या जवळ असणाऱ्या मोठ्या व्यक्तीनं शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली. त्याचे परिणाम गेल्या अडीच वर्षात दिसून आले आहेत. शिवसेनेचे ५५ पैकी ४० आमदार एका बाजूला गेले आहेत. पण या आमदारांचं का बरं ऐकलं गेलं नाही? कुणाच्या सल्ल्यामुळं ऐकलं गेलं नाही? कोणाच्या सांगण्यामुळं ऐकलं गेलं नाही? नेत्यांनी आता हा विचार केला पाहिजे की, हे ४० लोक आपल्याला जे सांगत होते त्यात आता तथ्य आढळून आलं आहे,” असंही शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा:
‘नवं सरकार सर्वसामान्यांचं आहे’
वीर सावरकरांचे विचार आम्हाला महाविकास आघाडीत असताना मांडता येत नव्हते!
ब्रिटनच्या आरोग्य सचिव, अर्थमंत्र्यांनी दिला राजीनामा
रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडिजचा स्पीड फिका पडला…
“आम्ही शिवसेना सोडली नाही आम्ही कोणतीही गद्दारी केली नाही. आम्हाला गद्दार म्हणणाऱ्या संजय राऊतांना आम्ही निवडून दिले आहे. त्यांनी जी काही अडीच वर्षे बडबड केली त्याला कोणीही महत्व देणार नाही. ज्या संजय राऊतांमुळे हे सगळ झालं त्याला महत्व देत नाही,” असं शंभुराज देसाई म्हणाले.
संजय राऊत यांच्यामुळे आम्ही आमदार नाही झालो. पण आमच्यामुळे संजय राऊत खासदार झालेत. राऊतच या सगळ्या प्रकाराला जबाबदार आहेत, अशी घाणाघाती टीका आमदार संदीपान भुमरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे हे आता सेना भवनात जात आहेत. बैठका घेत आहेत. हे त्यांनी पूर्वी करायला हवं होतं. उद्धव ठाकरे यांचे जवळचे लोक त्यांना भेटू देत नव्हते, असेही संदीपान भुमरे म्हणाले.