पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात झालेल्या त्यांच्या संरक्षणातील दिरंगाईची घटना अद्याप सगळ्यांच्या स्मरणात असताना आता आंध्र प्रदेशमध्ये दौऱ्यावर असताना त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे फुगे दाखवून ते हवेत सोडले. त्याचवेळी पंतप्रधान मोदी यांचे हेलिकॉप्टर हवेत होते. फुग्यांसोबत पोस्टर्सही बांधण्यात आली होती. सुरक्षा व्यवस्थेतील या त्रुटीची पुन्हा चर्चा सुरू झाली.
विमानतळाजवळ असलेल्या इमारतीवरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे फुगे सोडले. पंतप्रधानांच्या ताफ्यातील दोन हेलिकॉप्टर विजयवाडा येथील गन्नावरम विमानतळावरून उडाली. त्याचवेळी जवळच्या इमारतीतून हे फुगे सोडण्यात आले. जेणेकरून या हेलिकॉप्टरला काही अडथळा होईल. यासंदर्भातील माहिती पोलिस अधीक्षक सिद्धार्थ कुशल यांनी दिली.
हे ही वाचा:
विधानसभेत एकनाथ शिंदे यांची तुफान बॅटिंग; भाषणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा
कोकणपट्ट्यात पावसाने जोर पकडला, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या
शिवसेना वाचविण्यासाठी शहीद झालो तरी चालेल पण आता माघार नाही!
अजित पवार यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड
पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या १२५ व्या जयंती निमित्ते ही भेट दिली होती. त्यावेळी राजू यांच्या ३० फूट उंचीच्या ब्राँझ प्रतिमेचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. त्यावेळी मोदी म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. त्याचवेळी राजू यांची १२५वी जयंती साजरी होत आहे. राजू यांचे जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
त्याचवेळी मोगल्लू येथील ध्यान मंदिराचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. पडरंगी येथील राजू यांच्या जन्मस्थळाचा जीर्णोद्धारही त्यांनी केला. अल्लुरी राजू यांनी आदिवासींच्या अधिकारांसाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांचे कार्य सर्वांना प्रेरणा देणारे आहे. हैदराबादचा उल्लेख पंतप्रधानांनी भाग्यनगर असा केला. २-३ जुलैच्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ते सहभागी झाले होते. हैदराबादचे भाग्यनगर करण्याचा विचार सध्या केला जात आहे.