विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर हे तब्बल १६४ मतांसह विराजमान झाले आहेत. या निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेना यांच्यावतीने राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती तर महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांना उमेदवारी दिली गेली होती. पण राहुल नार्वेकर यांना १६४ तर साळवी यांना अवघी १०७ मते पडली. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदी नार्वेकर यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. या निवडणुकीतच बहुमत भाजपा-शिवसेनेकडे असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे सोमवारी होत असलेल्या विश्वासदर्शक ठरावात काय प्रतिबिंब पडेल हे या निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीकडे १७० आमदारांची ताकद असल्याचे सुरुवातीपासून सांगितले जात होते पण प्रत्यक्षात त्यांच्याकडे १०७ आमदार असल्याचे स्पष्ट झाले.
शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासोबत ५० पेक्षा अधिक आमदार असल्यामुळे नार्वेकर यांचा मार्ग मोकळा झाला होता तर तिकडे उद्धव ठाकरे यांच्या १६ आमदारांच्या गटाने आपली शिवसेना हीच खरी शिवसेना असा दावा केला होता.
भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर आणि महाविकास आघाडीचे राजन साळवी आमने सामने होते. यावेळी राहुल नार्वेकरांना १६४ आमदारांनी मतदान केले आहे. तर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे राजन साळवी यांना १०७ मतं पडली आहेत. त्यानुसार, राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. राहुल नार्वेकर यांना भाजपा, शिवसेना, मनसेचे आमदार राजू पाटील आणि बहुजन विकास आघाडीच्या आमदारांनी मतदान केले आहे. तर समाजवादी पार्टीचे आणि एमआयएमचे तीन आमदार तटस्थ राहिले आहेत.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदी ७ जुलैला वाराणसी दौऱ्यावर
अमरावती हत्या प्रकरणातील सूत्रधार इरफान खान जेरबंद
शिवसेनेचा बॉस कोण? शिंदे की ठाकरे?
बंडानंतर शिवसैनिकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश
राहुल नार्वेकर हे ४५ वर्षांचे असून अध्यक्षपदी निवड झाल्याने ते विधानसभेचे आजवरचे सर्वात तरूण अध्यक्ष आहेत. या विजयामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आपले बहुमत सिद्ध केले असून, महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. राहुल नार्वेकर यांचा चंद्रकांत पाटील यांनी प्रस्ताव मांडला आणि गिरीश महाजनांनी अनुमोदन दिलं. तर राजन साळवींचा प्रस्ताव चेतन तुपेंनी मांडला, तर संग्राम थोपटेंनी अनुमोदन दिलं.