भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंग याच्या विरोधात हरयाणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी एका इंस्टाग्राम लाईव्हदरम्यान युवराजने दलित समाजाबाबत एक आक्षेपार्ह कमेंट केली होती. युवराजची ही कमेंट दलित समाजाचा अपमान करणारी असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर युवराजने माफीदेखील मागितली होती. दरम्यान, वकील आणि दलित ह्यूमन राईट्सचे संयोजक रजत कलसन यांच्या तक्रारीनंतर हरयाणा पोलिसांनी युवराज सिंग विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) June 5, 2020
गेल्या वर्षी इंस्टाग्राम लाईव्ह चॅटदरम्यान टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहलबाबत बोलताना युवीने जातीवादी शब्द वापरले होते. यानंतर युवराजवर त्याच्या या टिप्पणीसाठी मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आली होती. त्यानंतर विश्वचषक विजेत्या या खेळाडूने एक निवेदन जारी करत या प्रकरणी माफीदेखील मागितली. युवराजच्या त्या जातीवादी वक्तव्यामुळे त्याच्याविरोधात भारतीय दंडविधानाच्या कलम १५३, १५३ (अ), ५०५, २९५ आणि एससी / एसटी कायद्यासंबंधित कलमांतर्गत युवीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जवळपास ८ महिन्यांपूर्वी युवराज सिंह आणि टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा हे दोघे इन्स्टाग्रामवर लाईव्ह चॅट करत होते. त्यावेळी यजुवेंद्र चहलबद्दल बोलताना युवराजने आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता. दलितांच्या हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते रजत कलसन यांनी युवीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.