पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषेत विधान केल्याप्रकरणी नागपूरमध्ये काँग्रेस नेत्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेते शेख हुसेन यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यांच्याविरोधात कलम २९४ (अश्लिल कृत्य आणि गाणी) तसंच ५०४ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमानजनक टिप्पणी करणे) या कलमांतर्गत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
शेख हुसेन हे नागपूर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीकडून नॅशनल हेराल्डशी संबंधित प्रकरणात चौकशी सुरू आहे. त्यांच्या होत असलेल्या चौकशीवरुन सध्या काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून काही ठिकाणी कार्यकर्त्यांची आंदोलनं सुरू आहेत. या आंदोलनात सहभागी झालेले असताना शेख हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह शब्दांत टिप्पणी केली. त्यामुळे नागपूर भाजपाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे शेख हुसेन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
‘ शंभर पाप करून, मांजर म्याव म्याव करायला अयोध्येला’
१८ तास चौकशीनंतर राहुल गांधींची आज पुन्हा चौकशी
आयपीएल मीडिया राईट्सच्या लिलावातून बीसीसीआयने कमावले इतके रुपये
संत तुकाराम शिळामंदिर हे भक्ती आणि ज्ञानाचा आधार
दरम्यान, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणात ईडी कारवाई करण्यात आली आहे. १८ तासहून अधिक चौकशीनंतर आज सलग तिसऱ्या दिवशी राहुल गांधींची चौकशी सुरू आहे.