अमेरिका आणि चीनमध्ये तैवानबाबत पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. चीनचे संरक्षण मंत्री वी फेंगे आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांची भेट झाली. या भेटीत चीनच्या मंत्र्यांनी सांगितलं की, “जर कोणी तैवानला चीनपासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही युद्ध सुरू करण्यास मागेपुढे पाहणार नाही” यापूर्वी जपानमध्ये क्वाड परिषद झाली होती तेव्हा अमेरिकेने म्हटलं होतं की, “चीनने तैवानवर हल्ला केला तर अमेरिका तैवानला लष्करी मदत करेल” चीन आणि अमेरिका हे दोन्ही देश सध्या एकमेकांना तैवान देशावरून धमक्या, इशारे देत आहेत. त्यामुळे चीन- तैवान- अमेरिका यांच्या संघर्षाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.
तैवान- चीन संघर्ष काय आहे?
तैवान हा देश चीनच्या मुख्य भूमीपासून भौगोलिकदृष्ट्या वेगळा आहे. दक्षिणपूर्व चीनच्या किनाऱ्यापासून साधारण १०० मैलांवर हे बेट आहे. तैवान हा स्वतःला स्वतंत्र देश मानतो. त्यांचं स्वतःच संविधान आहे. लोकांनी निवडलेलं सरकार तिथे आहे. मात्र, चीन अजिबात असं मानत नाही. चीनचं जसं भारताशी जुनं भांडण आहे; तसंच काहीसं चीन आणि तैवानचं आहे. चीन जशी आपली भूमी हडपण्याच्या प्रयत्नात असतो; तिच भूमिका चीनची तैवानबाबत आहे. हा वाद इतका विकोपाला गेलाय की चीन कधीही तैवानवर हल्ला करेल, अशी परिस्थिती आहे.
अगदी १९४९ पासून चीनची भूमिका अशी आहे की तैवान हा आमचा अविभाज्य आहे आणि आज ना उद्या तैवानला चीनमध्ये विलीन व्हावं लागेल. चीन जरी ही भूमिका नेहमी मांडत असला, तरी याबद्दल आधी फारसा आक्रमक नव्हता. मात्र, शी जिनपिंग सत्तेत आले आणि चीन अतिशय आक्रमक झाला आहे. त्यांनी जाहीरच केलं आहे की तैवानने लवकरात लवकर चीनमध्ये विलीन व्हावं. वेळ पडली तर लष्करी कारवाई करावी लागेल.
अमेरिका सध्या तैवानच्या बाजूने उघडपणे उभा राहिल्याचं चित्र आहे. जगभरातील काही देश तैवानला स्वतंत्र सार्वभौम देश मानतात आणि या देशांमध्ये अमेरिकेचा समावेश नाही. पण तरीही अमेरिका वेळोवेळी तैवानची बाजू घेत राहतो. याचं कारण म्हणजे तैवान जवळच्या बेटांवर अमेरिकन लष्करी तळ आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे तैवान हा अगदी छोटा देश असला तरी तंत्रज्ञानात तैवान आघाडीवर आहे. शिवाय जागतिक अर्थव्यवस्थेला तैवानची जास्त काळजी आहे. जगाला लागणाऱ्या एकूण सेमी कंडक्टरपैकी ९२ टक्के सेमी कंडक्टर एकटा तैवान पुरवतो. अमेरिकेच्या आणि जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी सेमी कंडक्टर फार महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तैवानवर चीनचं वर्चस्व अमेरिकेला मान्य नाही.
तैवान हे बेट हिंद प्रशांत महासागरात आहे. चीनची विस्तारवादी भूमिका पाहता चीन या भागात आपले हात पाय पसरतोय. त्यामुळे क्वाड सदस्य देशांची डोकेदुखी वाढलेली आहे. क्वाड सदस्य देशांचा विचार केला तर भारतासोबत चीनचे संबंध बरे नाहीत. अमेरिका- चीन संबंध विकोपाला गेलेले आहेत. जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांशीसुद्धा चीनचे काही फार बरे संबंध नाहीत. त्यामुळे अर्थात तैवानवर चीनची सत्ता या मोठ्या देशांना नक्कीच नको आहे.
चीन आणि तैवान यांच्या वादाचा इतिहास काय?
जपानने १९४१ मध्ये अमेरिकेच्या प्रशांत महासागरात असलेल्या पर्ल हार्बर बेटावर हल्ला केला होता. त्याचबरोबर जपानने चीनवरही हल्ला केला. १९४५ मध्ये जपानने शरणागती पत्करल्यानंतर तैवानचा ताबा चीनकडे आला. पुढे माओची क्रांती यशस्वी झाल्यामुळे, चँग कै शेक यांच्या राष्ट्रवादी सैन्याला तैवानमध्ये आश्रय घ्यावा लागला. तेव्हापासून चीन आणि तैवान यांच्यात वाद आहे. चीनच्या मते तैवान त्यांचा भाग आहे, तर तैवानी जनतेच्या मते त्यांचा देश स्वतंत्र आहे. पुढे महत्त्वाच्या देशांच्या लक्षात आलं की तैवानही महत्त्वाचे आहे.
हे ही वाचा:
अकबरुद्दीन ओवेसीच्या व्हिडिओवर अशोक पंडित संतापले
परदेशात बँक खाते आहे का, किती रक्कम आहे? ईडीने राहुलना विचारले!
राहुल गांधींची ईडी चौकशी सुरू; काँग्रेस कार्यकर्त्यांचे आकांडतांडव
लष्कर-ए-तोयबाच्या आदिल पर्रेसह २४ तासांत पाच दहशतवादी ठार
चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांनी जानेवारी २०१९ मध्ये लवकरात लवकर तैवानचे विलीनीकरण व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली होती. अर्थात तैवानच्या अध्यक्षांनी ही सूचना धुडकावली आणि तैवानची अडीच कोटी जनता हे होऊ देणार नाही, असंही त्यांनी ठामपणे स्पष्ट केलं. चीनच्या मते तैवानच्या सामुद्रधुनीवर त्यांचा हक्क आहे, तर अमेरिकेच्या मते ती आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीसाठी खुली आहे.
चीनच्या अंदाजानुसार २०२२ पर्यंत तैवान ताब्यात यायला हवा होता. रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याच्या तीन आठवडे अगोदर चीन व रशिया यांच्यात एक करार झाला होता आणि यानुसार रशियाने युक्रेनवर हल्ला केला, तर चीन पाठिंबा देईल आणि चीनने तैवानवर हल्ला केला, तर रशिया पाठिंबा देईल. म्हणूनच रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले, तेव्हा चीनने रशियाला पाठिंबा दिला होता; मात्र युक्रेन ज्या प्रकारे झुंज देतोय ते जगातल्या कोणत्याच देशाने अपेक्षित केलं नव्हतं. युक्रेन आठवड्याभरात शरण आला असता, तर एव्हाना चीनने तैवानवर हल्ला केला असता, असं तज्ज्ञांचं मत आहे. चीनची विमानं तैवानवर सतत घिरट्या घालत असतात. त्यामुळे तैवान मुद्द्यावर आता अमेरिका आणि चीनची भूमिका काय असणार आहे हे पुढे स्पष्ट होईलच.