जम्मू काश्मिरमधील कुलगाम जिल्ह्यात एका काश्मिरी पंडित शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सरकारी शाळेतल्या शिक्षिकेची हत्या करण्यात आली असून रजनी बाला असे त्यांचे नाव आहे. या हल्ल्यानंतर पोलिसांनी परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांच्या शोध सुरू आहे.
कुलगाम जिल्ह्यातील गोपालपोरा येथील सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत असणाऱ्या रजनी बाला यांची आज, ३१ मे रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हा हल्ला झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं काश्मीर पोलिसांनी सांगितलं आहे. या हल्ल्यानंतर पोलिसांनी शाळेच्या परिसराला घेराव घातला असून संशयित दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.
काश्मिरमध्ये पंडितांच्या हत्या वाढल्या असून मागच्या काही दिवसांत पंडितांना लक्ष्य करून हत्या करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी राहुल भट्ट या काश्मिरी पंडिताची सरकारी कार्यालयात घुसून हत्या करण्यात आली होती. तसेच काश्मिरमधील पंडितांना काश्मीर सोडा असे सांगणारे पत्र दहशतवाद्यांकडून आले होते.
हे ही वाचा:
काँग्रेसच्या आशिष देशमुख यांनी चिडून दिला राजीनामा
‘ आम्हाला रोखण्यासाठी आजोबा आणि नातवाचा प्रशासनावर दबाव’
जामा मशिदीच्या घुमटाचा कळस कोसळला आणि…
‘विभास साठे यांचा मनसुख हिरेन होऊ नये म्हणून सुरक्षा द्या’
दरम्यान, आज पहाटे जम्मू- काश्मीरमधील अवंतीपोरा येथे सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. यामध्ये सुरक्षा दलाला मोठ यश आलं असून दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.