दिल्लीत राहणाऱ्या हरियाणवी गायिकेच्या हत्येचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ही गायिका जवळपास दोन आठवडे बेपत्ता होती. तिचा मृतदेह आता हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात महामार्गाजवळ पुरलेला आढळून आला आहे. मृत गायिकेच्या कुटुंबीयांनी १४ मे रोजी दिल्ली पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. आता या प्रकरणी दोन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही गायिका ११ मे रोजी बेपत्ता झाली होती. दोन दिवस फोन बंद असल्याने तिच्याकडून कोणतीही माहिती न मिळाल्याने कुटुंबीयांनी १४ मे रोजी दिल्लीतील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, एका म्युझिक व्हिडिओच्या शूटिंगसाठी दोन पुरुष तिला दिल्लीहून भिवानी येथे घेऊन गेले होते.
१४ मे रोजी दिल्ली पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत कुटुंबाने तिच्यासोबत काम करणाऱ्या रवी आणि रोहित या दोन पुरुषांवर अपहरणाचा आरोप केला होता. मात्र, आता या प्रकरणात खुनाचे कलमही जोडले जाणार आहे. ही गायिका रोहितसोबत म्युझिक व्हिडिओ शूट करण्यासाठी भिवानी येथे गेली होती.
तपासादरम्यान रोहतकमधील मेहमजवळील एका हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांनी त्यांना एकत्र पहिले आहे. यानंतर मेहम येथील भैरो भैनी गावात उड्डाणपुलाजवळ मुलीचा मृतदेह पुरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता त्यांना एक मृतदेह आढळून आली आहे.
हे ही वाचा:
एटीएसची पुण्यात मोठी कारवाई, एका तरुणाला अटक
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार
आशा भोसले म्हणतात, पिझ्झा खाण्यापेक्षा भाकरी खा!
‘यशवंत जाधव हे उद्धव ठाकरेंचा उजवा हात’
रोहतक जिल्ह्यातील महामार्गाजवळ मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तो शवविच्छेदनासाठी पाठवला होता. त्यानंतर तिची ओळख हरियाणवी गायिका म्हणून झाली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्यावर खून आणि अपहरणाचे आरोप ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपी रवीने महिलेची हत्या केल्याची कबुली दिली आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.