मुंबई विशेष न्यायालयाने नोंदवलं निरीक्षण
मनी लाँडरिंग प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई विशेष न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार नवाब मलिक यांचे दाऊदच्या टोळीशी थेट संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे आहेत. विशेष न्यायालयाने नवाब मलिकांविरुद्धच्या खटल्याची सुनावणी करताना ईडीने सादर केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली. नवाब मलिक यांचे डी गॅंगशी संबंध होते असे न्यायालयाने म्हटले आहे.
विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी या आरोपपत्राची दखल घेताना स्पष्ट केलं की, नवाब मलिक यांनी डी कंपनीशी संबंधित असलेल्या हसिना पारकर, सलीम पटेल, सरदार खान यांच्यासोबत मनी लाँड्रिंगसाठीच गोवावलाल कंपाऊंडच्या अफरातफरीचा हा कट रचला. ज्यामधून या सर्वांनी मोठा आर्थिक घोटाळा करून बेहिशेबी मालमत्ता जमवली. त्यामुळे पीएमएलए कायद्यानुसार हे सर्व आरोपी या गुन्ह्याशी थेट संबंधित असल्यानं शिक्षेसाठी पात्र आहेत.
कुर्ल्यातील गोवाला कंपाऊंड ताब्यात घेण्यासाठी नवाब मलिक आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर आणि त्याचा अंगरक्षक सलीम पटेल यांच्यासोबत मंत्री नवाब मलिक यांच्या वारंवार बैठका झाल्या, मनी लॉंड्रिंग प्रकरणात त्यांचा सहभाग आहे असे प्राथमिक निरीक्षण रोकडे यांच्या खंडपीठाने नोंदवले आहे. त्यामुळे आता नवाब मलिक यांचा डी गॅंगशी संबध असल्याचे निरीक्षण नोंदवले गेल्याने आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
शिवलिंगाबद्दलची आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर प्राध्यापकाला अटक
२०२० चे प्रकरण उकरून काढत, केतकी चितळेंवर कारवाई
मुंबई विमानतळावर मुंबई- बंगळुरू विमानाचे आपत्कालीन लॅन्डिंग
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित
कुख्यात गुंड दाऊदशी संबंध आणि मनी लॉंड्रिंग प्रकरणात नवाब मलिकांना ईडीने अटक केले असून मालमत्ता खरेदी आणि गैरव्यवहार प्रकरणात मलिकांचा संबंध असल्याचा आरोप ईडीने केला आहे. कुर्ल्यातील मोक्याची जमीन कमी किंमतीत विकत घेतल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर एका पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर नवाब मलिकांना ईडीने २३ फेब्रुवारीला अटक केली होती.