दिल्लीच्या मंगोलपुरी विभागात राहणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. मृत कार्यकर्त्याचे नाव रिंकु शर्मा आहे. तपासातून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आणि मृत युवक यांच्यात आधी वाद झाला होता. हा वाद रामजन्मभूमी मंदिर निर्माण दानावरून वाद झाला होता, असे देखील सांगितले जात आहे. रिंकुची हत्या ही दुसऱ्या कुठल्यातरी वादामुळे झाली असावी, असा देखील संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलिसांनी एफआयआर दाखल करून चार आरोपींना अटकही केली आहे. मोहंमद इस्लाम, दानिश नसरुद्दीन, दिलशान आणि दिलशाद इस्लाम अशी चार संशयीतांची नावे आहेत.
हे ही वाचा: काँग्रेस आमदाराने दिली राम मंदिराला देणगी, राम मंदिराला देणगी दिल्याने लेखकावर टीका
मिळालेल्या माहितीनुसार, रिंकु शर्मा दिल्लीच्या मंगोलपुरी परिसरात आपल्या परिवारासमवेत राहत होता. तो पश्चिम विहार इथल्या एका रुग्णालयात नोकरी करत होता. परिवारात त्याची आई राधा देवी, पिता अजय शर्मा शिवाय अंकित आणि मनु शर्मा हे भाऊ देखील आहेत. हा पूर्ण परिवार बजरंग दलाशी संबंधित असून रिंकु शर्मा दलाच्या विविध कार्यक्रमात उत्साहाने भाग घेत असे.
बुधवारी रात्री हल्लेखोरांनी जबरदस्तीने रिंकुच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला केला. सुमारे २५-३० लोकांचा जमाव त्याच्या घरात शिरला आणि त्याला चाकूने निर्घृणपणे भोसकण्यात आले. प्राणघातक हल्ल्यानंतर सर्व हल्लेखोर फरार झाले. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या रिंकुला मंगोलपुरीतीतल राजीव गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु गुरूवारी दुपारी १२ वाजता त्याचा मृत्यु झाला.
मंगोलपुरी विभागात मागच्या महिन्यात श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माणाशी निगडीत जागरूकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅली दरम्यानच रिंकुचे आणि या परिसरातील काही युवकांचे भांडण झाले. परंतु त्यावेळी इतर लोकांनी हस्तक्षेप केल्यामुळे मामला मिटला. बुधवारी रिंकु एका वाढदिवसाच्या पार्टीत गेलेला असताना पुन्हा एकदा हल्लेखोर आणि तो यांच्यात वादावादी झाली आणि त्याच रात्री रिंकुवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.