२०१९ मध्ये प्रदुषणाचा अर्थव्यवस्थेला १.९ टक्क्यांचा फटका
‘लॅन्सेट’ या प्रथितयश मासिकात प्रसिध्द झालेल्या एका अभ्यासाच्या अहवालानुसार १९९० पासून सुमारे १६.६ लक्ष भारतीयांनी प्रदुषणाशी निगडीत विविध कारणांनी आपला जीव गमावला आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला सुद्धा १.४ टक्क्यांचा फटका बसला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत ‘इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ (आय.सी.एम.आर), ‘पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया’ (पी.एच.एफ.आय), ‘इन्स्टिट्युट फॉर हेल्थ मेट्रिक्स एण्ड इव्हॅल्युएशन’ (आय.एच.एम.इ.) आणि देशभरातल्या इतर शेकडो संस्थांच्या सहकार्याने ‘इंडिया स्टेट लेव्हल डिसीज बर्डन इनिशिएटीव्ह’ (आय.एस.एल.डी.बी.आय) सुरू करण्यात आला होता. या अंतर्गत १९९०-२०२० या काळातील प्रदुषणाचे आरोग्यावर झालेले विविध परिणाम, त्यामुळे झालेले आकस्मिक मृत्यू यांचा अभ्यास करण्यात आला.
“तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे वायू प्रदुषणाचे नेमके परिणाम जाणून घेणे या अहवालासाठी शक्य झाले आहे. हा बदल आधी काढल्या जाणाऱ्या प्रदुषणाच्या परिणामांच्या अंदाजापेक्षा अधिक चांगला अंदाज लावायला उपयुक्त ठरला आहे. २०१९ मध्ये प्रदुषणामुळे भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पान्नाचे १.४ टक्क्यांनी नुकसान झाले होते. सर्वसाधारपणे सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ०.४ टक्के उत्पन्न प्रदुषणाशी निगडीत आजारांवर खर्च होतो.” असे आय.एस.एल.डी.बी.आय चे संचालक ललित दाडोना यांनी सांगितले.
“भारत सरकारने वायू प्रदुषण रोखण्यासाठी विविध योजना आखल्या आहेत. वायू प्रदुषण रोखण्यासाठी केलेल्या गुंतवणूकीतून मिळणारा परतावा हा आरोग्य व्यवस्था आणि अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करून मिळणाऱ्या परताव्यापेक्षा अधिक असेल” असेही दादोना यांनी सांगितले.
भारत सरकारने घरगुती प्रदुषण रोखण्यासाठी प्रधान मंत्री उज्ज्वल योजना आणि उन्नत चुल्हा अभियान या योजना राबवायला सुरूवात केली आहे. या अभ्यासातून असेही समोर आले आहे की, एकूण प्रदुषणाने होणाऱ्या आजारांपैकी ४० टक्के आजार हे फुफ्फुसांशी निगडीत असतात, तर उर्वरीत ६० टक्के आजार हृदयविकार, आकडी येणे इत्यादी प्रकारचे असतात.