बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने छापा घातला आहे. ईडीचे अधिकारी सकाळी ८:३० पासून एबीआयएल हाऊसमध्ये झाडाझडती करत आहेत. अविनाश भोसले हे मोठे बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक आहेत. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट (फेमा) संबंधीच्या प्रकरणात त्यांची ईडीकडून चौकशी होत आहे. हे ६ वर्षांपूर्वीचे विदेशी चलन प्रकरण आहे.
दरम्यान, अविनाश भोसले यांची यापूर्वीही ईडीने चौकशी केली होती. नोव्हेंबर महिन्यात तब्बल दहा तास त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली होती. फेमा कायद्यांतर्गत त्यांची चौकशी करण्यात आल्याचं वृत्त आहे. यापूर्वीही आयकर विभागाने भोसले यांच्या घरावर छापा मारला होता. भोसले यांच्या पूणे आणि मुंबईतील २३ ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी मारल्या होत्या.
अविनाश भोसले यांच्यासह त्यांच्या मुलीला म्हणजेच राज्याचे कृषीराज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांनाही ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती आहे. दोन आठवड्यापूर्वीच हे वृत्त आले होते. मात्र याबाबत विश्वजीत कदम यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
अविनाश भोसले यांना ओळखणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते १९८० च्या दशकात रिक्षा चालवत होते.त्यानंतर त्यांचा बांधकाम व्यवसायाशी संबंध आला आणि ते सरकारी कंत्राटदार बनले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.आज ते कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे मालक आहेत. पुण्यात त्यांना रिअल इस्टेट किंग म्हणून ओळखले जाते.
अविनाश भोसले यांची कन्या स्वप्नालीचा विवाह माजी मंत्री, दिवंगत पतंगराव कदम यांचे चिरंजीव आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्याबरोबर झाला होता.पुण्यातील सर्वात रॉयल विवाह सोहळा म्हणून हा विवाह सोहळा ओळखला जातो. या विवाहाला अभिनेता सलमान खान यांच्यासह तत्कालीन केंद्रीय मंत्रीही आले होते.