काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सोनिया गांधींची एकत्र भेट घेतली. या भेटूमुळे अनेक शक्यतांना वाचा फुटली. त्यात पटोले आणि राऊत यांच्यात पदांची अदलाबदल होतेय अशीही चर्चा होती. पण आता या नव्या चर्चेनं आणि नावाने याला नवे वळण मिळाले आहे.
नाना पटोले यांनी विधानसभा सभापतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता कोण अध्यक्ष होणार याची चर्चा जोरात सुरु आहे. त्यात पृथ्वीराज चव्हाणांपासून ते के.सी.पाडवी यांच्या नावापर्यंत चर्चा झाली. त्यातच आता आणखी एक नाव समोर येतं आहे. हे आहेत काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे. विधानसभा सभापती म्हणून काँग्रेस थोपटेंवर विश्वास दाखवू शकते अशी चर्चा आहे. सध्या काँग्रेसमध्ये विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र असे दोन गट पडलेले दिसतात. त्यात थोपटे सभापती झाले तर विदर्भाला मिळालेला मान पुन्हा पश्चिम महाराष्ट्राला मिळेल.
उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी झाला आणि ऐन नव्या वर्षाच्या तोंडावर काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी पुण्यातल्या ऑफिसवर हल्ला केला. जोरदार तोडफोड केली. दगडफेक केली. थोपटेंना मंत्री केलं नाही म्हणून कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचं सांगितलं गेलं. हे कार्यकर्ते थोपटेंचे कार्यकर्ते होते असाही दावा खुद्द कार्यकर्त्यांनी केला. अर्थातच दुसऱ्या दिवशी थोपटेंनी तोडफोडीची पहाणी केली. कार्यकर्ते त्यांचे नसल्याचं स्पष्ट केलं. त्यावेळेस थोपटेंची चर्चा राज्यभरात झाली. आताही त्यांचं नाव सभापतीपदासाठी समोर येत आहे ते कदाचित त्यांचं मंत्रिपद हुकलं म्हणूनही असेल. पण काँग्रेस भवनच्याच तेही पुण्यासारख्या ऐतिहासिक ठिकाणच्या तोडफोडीत नाव आलेल्या नेत्याला विधानसभा सभापती केलं जाणार का? हाही चर्चेचाच विषय आहे.