पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत बोलत असताना भावुक झाले. काश्मीरमध्ये एका दहशतवादी हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्या काही गुजरातच्या नागरिकांबद्दलचा प्रसंग सांगताना मोदींना अश्रू अनावर झाले. नरेंद्र मोदी राज्यसभेत निवृत्त होणाऱ्या राज्यसभा खासदारांना निरोप देण्यासाठी भाषण करत होते. यावेळी त्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या कार्याचं कौतुक केलं.
राज्यसभेतील विरोधीपक्षनेते गुलाम नबी आजाद, शमशेर सिंह, मीर मोहम्मद फैयाज, नादिर अहमद हे सदस्य निवृत्त होत आहेत. त्यांना निरोप देण्यासाठी नरेंद्र मोदी बोलत होते. “या सर्वांनी राज्यसभेचा गौरव वाढवण्याचं काम केलं. त्यांचा अनुभव, त्यांचं ज्ञान याचा देशाला फायदा झाला. या सर्वांनी त्यांच्या क्षेत्रांचा विकास करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मी त्यांचा आभारी आहे.” असे मोदी म्हणाले.
“गुलाम नबी आझाद ज्यावेळी जम्मू काश्मीर राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी मी देखील गुजरातचा मुख्यमंत्री होतो. त्यावेळी आमचे जवळचे संबंध होते. ज्यावेळी गुजरातच्या यात्रेकरुंवर दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यामध्ये ८ जण मारले गेले. त्यावेळी सर्वप्रथम गुलाम नबी आझाद यांचा फोन आला होता. त्यावेळी फोनवर बोलताना ते अश्रू रोखू शकत नव्हते. त्यावेळी गुलाम नबी आझाद आणि तत्कालीन संरक्षण मंत्री प्रणव मुखर्जी यांनी गुजरातच्या लोकांसाठी केलेले प्रयत्न विसरु शकत नाही. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती अडकल्यासारखं काम केलं.” असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
“गुलाम नबी आझाद यांच्या नंतर जे त्यांचं पद सांभाळतील त्यांना गुलाम नबी आझाद यांनी त्या पदाला दिलेली उंची गाठण्यासाठी कष्ट करावे लागतील. गुलाम नबी आझाद यांना त्यांच्या पक्षासोबत देशाची आणि राज्यसभेची काळजी असायची.” असेही मोदी म्हणाले.