भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांना उच्च न्यायालयाने तूर्तास मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सोमय्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मात्र जामीन मंजूर केला असला तरी यासाठी सोमय्यांना तीन अटी घालण्यात आल्या आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने किरीट सोमय्यांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे. तसेच, अटक झाल्यास ५० हजारांच्या जामिनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय सोमवार, १८ एप्रिलपासून सलग चार दिवस चौकशीला हजेरी लावण्याचे निर्देशही किरीट सोमय्यांना दिले आहेत. यामध्ये दुपारी ११ ते २ या वेळेतच सोमय्यांनी चौकशीला हजेरी लावणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
किरीट सोमय्यांना गुन्हे शाखेने आज ११ वाजता चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटिस पाठवली होती. या प्रकरणात सोमय्यांची बाजू मांडण्यासाठी वकील विवेकानंद गुप्ता हे पोलीस आयुक्त कार्यालयात गेले होते. मात्र आजही किरीट सोमय्या चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यावेळी, योग्य वेळी किरीट सोमय्या समोर येतील, असे सोमय्यांचे वकील विवेकानंद गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
हे ही वाचा:
गुणरत्ने सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलीस घेणार
दोन वर्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंत्रालयाला भेट
नवाब मलिकांची १४७ एकर जमीनीसह आठ मालमत्ता जप्त
‘मुंब्र्यात कोंबिंग ऑपरेशन करा’
विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी निधी गोळा करून ती रक्कम सोमय्या यांनी गहाळ केल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमय्यांच्यावर केला होता. त्यानुसार किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे हा पैसा कुणाच्या खात्यात गेला? त्यातून काही मालमत्ता विकत घेतलीय का? याची चौकशी करण्यासाठी सोमय्यांना कोठडी मिळणं आवश्यक असल्याची भूमिका मुंबई पोलिसांनी घेतली होती. अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी सोमय्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.